BJP Adhyatmik: महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडी (Eggs) देण्याऐवजी देशी गाईचं दूध, सुकामेवा देण्यात यावा अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीने केली आहे. त्याच बरोबर येणाऱ्या 20 तारखेच्या आत हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करू, तसेच शाळांपर्यंत अंडी पोहोचू देणार नाही असा इशाराही भाजप अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) आळंदीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहसंयोजक किशोर महाराज दोंडगे हेही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
भावना चांगलीही असू शकते
महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने 7 नोव्हेंबर रोजी शालेय पोषण आहारामध्ये अंडी देण्याचा निर्णय काढला आहे. हा निर्णय घेत असताना त्यांनी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये प्रोटीन मिळावे म्हणून अंडी खाण्याचा निर्णय देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तुषार भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पोषण आहाराबाबतची राज्यशासनाची ही भावना चांगलीही असू शकते मात्र प्रत्येकाच्या कुटुंबाचे काही नियम असतात असंही तुषार भोसले यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा>> Chetan Singh : “हिंदुत्व धोक्यात’ची भीती”, चौघांची हत्या करणाऱ्या जवानाच्या पत्नीने काय सांगितलं?
शुद्ध शाकाहारी कुटुंबांचा नियम
राज्यात वारकरी संप्रदाय घराघरामध्ये आहे, त्याच बरोबर महानुभाव पंथ, अध्यात्मिक संप्रदाय आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या कुटुंबाचे नियमही ठरलेले असतात. त्यामुळे या शासनाच्या नियमामुळे शुद्ध शाकाहारी कुटुंबांचा नियम मोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे अध्यात्मिक आघाडीने सांगितले आहे.
अंड्याची एकही गाडी…
महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय मागे नाही घेतला तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच या निर्णयाचा निषेध व्यक्त करून हा निर्णय रद्द करावा अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच सरकारने हा निर्णय 20 तारखेपर्यंत निर्णय मागे घेण्यात आला नाही तर अंड्याची एकही गाडी पुढे येऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT