Ajit Pawar On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काकांना (शरद) टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. अजितदादांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अनेकदा शरद पवारांवर टीका-टिप्पण्या करत कधी त्यांचं वय काढलं तर कधी भलतेच सल्ले दिले. आताही नाव न घेता अप्रत्यक्षणे त्यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा खेळ सध्या चांगलाच रंगला आहे. या सर्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे बारामती मतदारसंघ कुठल्या पक्षाकडे जाणार? हा चर्चेचा विषय ठरत आहे. हे महायुतीमध्ये अद्याप ठरलेलं नाहीये तसंच अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणासुद्धा झालेली नाही आहे.
पण, अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (अजित पवारांच्या पत्नी) या निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. तसंच, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. हे सर्व सुरू असताना गुरूवारी (14 मार्च) बारामतीमध्ये अजित पवार यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी काका शरद पवार यांचं नाव न घेता खोचक टोमणे मारले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"उतारवयातील लोकांनी आशिर्वाद देण्याचं काम करायचं असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फारच कंटाळा आला तर भजन करायच असतं. सध्या खूप जणांना फोन येत आहेत. खूप जणांना बोलावलं जातंय. भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हायचं की, विकास कामांच्या मागे उभं रहायचं हे आता तुम्ही ठरवायचं आहे” असं अजित पवार मतदारांना स्पष्ट म्हणाले आहेत.
पुढे अजितदादा म्हणाले की, "आपल भलं करुन घ्यायचं, तालुक्याच्या सर्वांगिण विकास करायचा की, तालुक्यातील विकासकामांना खीळ निर्माण करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे." त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ADVERTISEMENT