Maharashtra Assembly Special Session Live : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सुरूवात झाली असून, येत्या 9 तारखेपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात आमदार शपथ घेतील, तसंच अध्यक्षही निवडले जातील अशी शक्यता आहे. सध्या कालीदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. नुकताच राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. 5 डिसेंबरला पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर तातडीनं 7 ते 9 डिसेंबर हे विशेष अधिवेशन पार पडत आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:18 PM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. सुळे म्हणाल्या, EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. इंडिया आघाडीची बैठक आणि चर्चा झाली. काँग्रेस पक्ष यावर काम करत आहे. अनेक लोकांकडून आम्हीं मार्गदर्शन घेणार आहोत. लोकांच्या मनात अस्वस्थता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे. जगातील अनेक देश बॅलेट वर शिफ्ट झाले आहेत. निवडणुका पारदर्शक व्हाव्यात.
- 09:14 PM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : "जनतेची दिशाभूल...", CM देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर साधला निशाणा
विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी सांगून शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. 'जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?', असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेसबुक पोस्ट करून शरद पवारांना रोखठोक उत्तर दिलं आहे. फडणवीस फेसबुक पोस्ट शेअर करत म्हणाले, "श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे".
- 06:32 PM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं कारण, म्हणाले...
ईव्हीएमच्या विरोधात वातावरण निर्मिती असणार आहे, येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका असणार आहे? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, यावर आज भाष्य करणं योग्य नाही. ते म्हणतात, लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आताच कसा आक्षेप घेतला. पण आमचं निरिक्षण असं आहे की, 4 निवडणुका आता झाल्या आहेत. हरियाणाच्या निवडणुकांमध्ये भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली, त्याचवेळी जम्मु काश्मीरमध्ये फारुक अब्दुला यांचा पक्ष आला आणि तिथे काँग्रेसचा पराभव झाला.
- 12:25 PM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : आय लव्ह मारकडवाडीचे फलक झळकावले, विरोधी पक्षाचे आमदार आज शपथ घेणार नाही
नाना पटोले, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी I LOVE MARKADWADI लिहिलेले फलकही त्यांनी झळकावले. हे जनतेने दिलेलं मँडेट आहे की, EVM ने दिलेलं आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मारकडवाडीमध्ये जनतेने मॉक पोल घ्यायची तयारी केली होती, आमचे जिंकलेले उमेदवारही त्याला पाठिंबा देत होते असं आदित्य ठाकरे म्हणाले. मारकडवाडीमध्ये काही लोकांना अटकही केली आहे. आम्ही जिंकून आलो आहोत, मात्र निवडणूक आयोगाबद्दल आमच्या मनात शंका आहे, EVM बद्दल शंका आहे, त्याचा आम्ही निषेध म्हणून आम्ही शपथ घेणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. महात्मा गांधी यांनी जसं चिमुटभर मीठ उचलून सत्याग्रह केला होता तसं आता मारकडवाही हे आधुनिक भारताचा मार्ग बदलण्याच्या कामाला सुरूवात करेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
- 11:42 AM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : अंबादास दानवेंच्या दालनात बैठक, विरोधी पक्ष काय भूमिका घेणार?
अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील दालनात विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीत आमदारांच्या शपथविधीबद्दलची भूमिका निश्चित केली जाणार आहे. EVM वर अविश्वास व्यक्त करण्यासाठी, जनतेच्या EVM विरोधातील भूमिकेचा आवाज बनण्यासाठी आज विरोधी पक्षातले आमदार आज शपथ घेणार नाहीत असं काही आमदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
- 11:35 AM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : "...म्हणून विरोधी पक्षातील आमदार शपथ घेणार नाहीत?"
EVM बद्दल लोकांच्या मनात शंका आहे, राज्यातील अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले, त्यामुळे मतदारांनी टाकलेल्या विश्वासामुळे आम्हाला EVM चा निशेष नोंदवणं हे आमचं पहिलं काम आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी आपली भूमिका मांडली. तसंच विरोधी पक्ष बैठक घेऊन शपथ कधी घ्यायची हे निश्चित करणार आहे.
- 11:29 AM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : चयनसुख संचेतींची पहिली शपथ
आमदार चयनसुख संचेतींची सर्वात आधी आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, आशिष जयस्वाल यांच्यासह अनेक आमदारांनी शपथ घेतली आहे.
- 11:16 AM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंचं हस्तांदोलन
विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी सगळे आमदार सध्या मुंबईत दाखल झाले असून, आज विधान भवनात कामकाजाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे विधान भवन परिसरात आमने-सामने आले असता, त्यांनी हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
- 11:13 AM • 07 Dec 2024Maharashtra Assembly Special Session Live : कालीदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष, कामकाजाला सुरूवात
भाजपचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली असून, विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सुरूवात झाली आहे. आज आमदारांच्या शपथविधीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आज कोणकोणते आमदार शपथ घेणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT