Maharashtra News Live : महायुती सरकारविरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

मुंबई तक

21 Jun 2024 (अपडेटेड: 21 Jun 2024, 01:05 PM)

Maharashtra News Live Updates : वाचा महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडींबद्दलची माहिती, हवामान अपडेट्स लाईव्ह...

Mumbaitak
follow google news

Maharashtra Live Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळू लागले आहे.

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही महिनेच राजकीय पक्षांच्या हातात असून, सगळ्यांनीच आता पक्ष बांधणी करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. 

महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून यावर चिंतन मंथन सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवरही काम सुरू आहे. 

काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातच सध्या शरद पवार फिरत असून, ते निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे म्हटले जात आहे. 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थही आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत. आता लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आता आरक्षणाच्या मुद्द्याभोवती फिरताना दिसत आहे. 

या सगळ्या संदर्भातील ताजे अपडेट्स आणि विश्लेषण वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये....

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:51 PM • 21 Jun 2024
    Maharashtra News : 'मराठ्यांच्या नेत्यांचे पाय धुवून पाणी प्यायला सुरूवात करा', जरांगेंचा सरकारला टोला!

    'सगेसोयऱ्याच्या व्याख्येप्रमाणे आरक्षण द्यावं. तुम्ही आम्हाला फसवलं तर तुम्हालाही डुबवणार... सरकारकडून जातीवाद वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. मी तणाव पसरवतो असं सांगत होते. माझ्याकडून कधीही जातीवाद झाला नाही. ओबीसींचं वाटोळं करण्याची माझी इच्छा नाही. 10 ते 15 जणांचं टोळकं ओबीसींचं वाटोळं करतंय... मराठा समाजाच्या मागे उभे रहा... ओबीसी नेत्यांचा मराठ्यांबद्दलचा द्वेष बाहेर काढला. लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर सरकार गप्प का? ओबीसी नेते नालायक असून ते त्यांना चांगलं म्हणतात. सगळे ओबीसी नेते उघडे पडले. मराठ्यांच्या नेत्यांचे पाय धुवून पाणी प्यायला सुरूवात करा.' असा टोला जरांगेंनी सरकारला लगावला.   

  • 01:01 PM • 21 Jun 2024
    Maharashtra News : महायुती सरकारविरोधात कल्याणात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन 

    महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी इत्यादी मुद्द्यांविरोधात कल्याणातही काँग्रेस पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

    महापुरुषांचा सतत अपमान, जाती-धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ सतत खराब करणे, औद्योगिक विकासाला खिळ, पेपर फुटीचे ग्रहण, NEET चा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान, बेरोजगारी, शेतकऱ्यांची उपेक्षा, गुन्हेगारीत वाढ, अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली. तसेच या प्रश्र्नी राज्य सरकारचा विरोध म्हणून यावेळी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला. 

  • 12:36 PM • 21 Jun 2024
    Maharashtra News : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच आंदोलन

    महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन आहे. चिखल फेक आंदोलन करत ते सरकारचा निषेध करत आहेत. महागाई , बेरोजगारी , नीट परीक्षा ,खते बियाण्याचा काळाबाजार या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे.

     

  • 12:27 PM • 21 Jun 2024
    Maharashtra News : बच्चू कडू यांची पोलीस सुरक्षा वाढवू- पंकज कुमावत

    बच्चू कडू यांचे पत्र आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा याचा सर्व बाजूने तपास करत आहे. सुरक्षा वाढवण्याची गरज भासल्यास आम्ही बच्चू कडू यांची पोलीस सुरक्षा वाढवू. सायबरच्या माध्यमातून देखील आम्ही चौकशी करत आहोत, असे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी म्हटले.

     

  • 11:30 AM • 21 Jun 2024
    Maharashtra Breaking News Live : "बच्चू कडूला मी स्वतः संपवणार"

    आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. 

    माझ्या जीविताला धोका असून, माझा अपघात झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मला नागरिकांचे फोन येत आहेत, असे कडूंनी पत्रात म्हटले आहे. 

    बच्चू कडूंनी त्यांच्या पत्रात जे म्हटले आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे. पत्रात अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीबद्दलचाही उल्लेख केलेला आहे. 

    "शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोलीला राहतो. माझे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसे शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत. तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही. बच्चू कडूला पाहून घेऊ. आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे."

  • 11:08 AM • 21 Jun 2024
    OBC Reservation : शिंदे सरकार 'अ‍ॅक्टिव्ह', बोलावली तातडीची बैठक

    मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे अन्नत्याग उपोषण सुरू केले असून, आता सरकारने या प्रकरणात लक्ष घातले आहे. 

    कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्य शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवरून हाके यांच्याशी संवाद साधला. 

    दरम्यान, यासंदर्भात सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करणार आहे. यात छगन भुजबळ, पंकजा मुंडे,धनंजय मु्ंडे,प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर,विजय वडेट्टीवार,सत्संग मुंडे हे असणार आहेत. आज (21 जून) सायंकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे. 

     

  • 09:11 AM • 21 Jun 2024
    Ramdas Kadam : 'तुमची एक लंगोट आमच्यामुळे वाचली', अमोल मिटकरींना कदमांनी सुनावलं

    "अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. उशीरा आले असते, तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात, हे विसरू नका", अशी टीका करणाऱ्या आमदार अमोल मिटकरींना रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिले. 

    "लंगोट कुणाची गेली? त्याला (अमोल मिटकरी) विचारा... तुमची लंगोट जी वाचली. एक तटकरे आला. त्या तटकरेला जागा कुणी मिळवून दिली, त्याला विचारा मिटकरीला. कोण मिटकरी आहे? मी त्याला ओळखत पण नाही. पण, त्यांची एक लंगोट जी आलीये ना, तटकरे. त्याला म्हणावं तटकरेला विचारून घे", असा पलटवार कदमांनी केला. 

    "तिथे (रायगड लोकसभा) धैर्यशील पाटीलला भाजपने जाहीर केले होते. ती जागा कशी मिळवून दिली, ते तटकरेंना माहिती आहे. मला माहिती आहे. तटकरेंसाठी आम्ही काय केले, हे तटकरेला आणि आम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा तू तुझी लंगोट सांभाळ आणि मग आमच्या लंगोटीला हात घालायचा प्रयत्न कर", अशा शब्दात कदमांनी मिटकरींना सुनावले. 

follow whatsapp