Maharashtra Political News : शिवसेनेचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी एक विधान केलं, ज्याची राज्यात बरीच चर्चा झाली. “शिवसेनेच्या आमदारांनी केलेले बंड यशस्वी झाले नसते, तर एकनाथ शिंदे हे गोळी झाडून घेणार होते”, असं केसरकर म्हणाले. त्यांच्या याच विधानावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड असंही म्हणाले की, “सत्ता मिळाली नाहीतर माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन, हेच त्यांचं मत होते.”
ADVERTISEMENT
नागपुर दौऱ्यात असताना जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिपक केसरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल भाष्य केले. “सत्ता हे सर्वस्व आहे. सत्ता नाही मिळाली, तर माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन, हेच त्यांचं मत होतं. लोकशाहीत असं नसतं. तुम्हाला जनतेला सामोरं जावं लागतं. जय-पराजय हा अविभाज्य घटक आहे”, असं आव्हाड या विषयाच्या अनुषंगाने म्हणाले.
मविआचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदेंचा दुरावा
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिल्यांदा दुरावा कधी आला होता, याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्त्वाचं विधान केले आहे. “महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबर नव्हते. याचा पुरावा कुणाला हवा असेल, तर मी द्यायला तयार आहे”, असं आव्हाड यांनी सांगितलं.
हेही वाचा >> Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते मार्गदर्शक”
“उद्धव ठाकरेंच्या आधी मी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं एकनाथ शिंदेंच्या मनात होतं”, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
शिवसेनेतील बंडखोरीला वर्ष झालं. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही महाराष्ट्रात विविध ठिकाणी निदर्शने केली. त्यावर शिंदेंच्या सेनेकडून गद्दार, खोके याशिवाय विरोधकांकडे काही शिल्लक राहिलं नाही, अशी टीका झाली.
हेही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा म्हणाले मला पक्षात पद द्या, शरद पवारांनी थेट…
त्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तुम्ही केले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. कर्नाटकातील 40 टक्क्यांवर सगळं सरकार गेलं. तुमचे 50 टक्के तर घराघरांत पोहोचले आहे. गाढव, म्हैस आणि घोड्यांवर 50 खोके लिहितात. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात राग किती आहे, याचा विचार करा”, असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं.
ADVERTISEMENT