Maha Vikas Aghadi Lok Sabha 2024 Election : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सन्मानाने बोलवलं तर येऊ, अशी भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीने तातडीने हालचाली केल्या. त्यानंतर रात्रीत राजकीय घडामोडी घडल्या आणि प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होण्यास होकार दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत येण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची (शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी पवार आणि काँग्रेस) जागावाटपासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत सहभागी होण्यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं होतं. त्यावरून आंबेडकरांनी सणसणीत पत्र लिहित पटोलेंना सुनावलं.
इतकंच नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसने तुम्हाला दिलेला नसल्याचेही आंबेडकर म्हणाले. काँग्रेसच्या अध्यक्षांनी किंवा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सन्मानाने बोलावले तर बैठकीला येऊ असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटलांनी केला कॉल, चेन्नीथला यांनी काय सांगितलं?
प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात नंतर पडद्यामागे घडामोडी घडल्या. याबद्दल माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, “आंबेडकरांनी पटोलेंना लिहिलेल्या पत्रानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॉल केला. या कॉलवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला हेही होते.”
जयंत पाटील यांनी चेन्नीथला यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांचं बोलणं करून दिलं. या कॉलवरच चेन्नीथला यांनी आंबेडकरांना सांगितलं की, यासंदर्भात बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिले आहेत. पुढच्या वेळी महाविकास आघाडीची बैठक होईल त्यात वंचित बहुजन आघाडीने सहभागी व्हावं, अशी विनंतीही चेन्नीथला यांनी आंबेडकरांना केली.
आंबेडकरांनी चेन्नीथला यांना काय सांगितलं?
चेन्नीथलांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काही मुद्दे उपस्थित केले. ज्यात त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात मराठा-ओबीसी वाद पेटलेला आहे. जरांगेंचे आंदोलन, मराठा आरक्षण यासंदर्भात रास्त भूमिका घेणे आवश्यक असल्याचे आंबेडकर चेन्नीथला यांना म्हणाले. ओबीसी, मराठा आरक्षणात आम्ही सुरुवातीपासून आहोत, त्यामुळे यावर तुमची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असे आंबेडकर म्हणाले. त्यावर चेन्नीथला यांनी सकारात्मक भूमिका मांडली. पुढच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडी सहभागी होणार, अशी माहिती आंबेडकर यांनी चेन्नीथला आणि जयंत पाटलांना दिली.
ADVERTISEMENT