Bharat Jodo Nyay Yatra Live, Maharashtra news Live : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली. यात्रेचा मुंबईत समारोप होत असून, याबद्दलचे सर्व अपडेट्ससह महाराष्ट्रातील सर्व राजकीय आणि इतर घडामोडी वाचा लाईव्ह...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 10:17 PM • 17 Mar 2024'ठाकरे किती लाचारी...', भाजपची जोरदार टीका
आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते.
मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
- 08:46 PM • 17 Mar 2024राज्याचा आत्मा ईव्हीएममध्ये; राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान
भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "आम्ही एका व्यक्तीविरुद्ध लढत नाहीये. आम्ही भाजपविरोधातही लढत नाहीये. एका व्यक्तीचा चेहरा बनवून समोर ठेवला आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही एका शक्तीविरोधात लढतोय. आता प्रश्न आहे की, ती शक्ती काय आहे. आता कुणीतरी बोललं की राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील प्रत्येक संस्थेत आहेत. ईडी, सीबीआयमध्ये आहे. याच राज्याचे एक वरिष्ठ नेता काँग्रेस पक्षाला सोडतात आणि माझ्या आईला रडून सांगतात की, सोनियाजी मला लाज वाटतेय की, माझ्यात या लोकाशी, या शक्तीशी लढण्याची हिंमत नाहीये. मला तुरुंगात जायचे नाही. आणि हे एक नाहीत. असे हजारो लोक आहेत, ज्यांना घाबरवले गेले आहे. तुम्हाला काय वाटतंय की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असेच गेले. नाही, ज्या शक्तीबद्दल मी बोलतोय, त्या शक्तीने त्यांना भाजपकडे नेले आहे. ते सगळे घाबरून गेले आहेत, असा हल्ला राहुल गांधींनी भाजपवर केला.
- 08:15 PM • 17 Mar 2024"जे आमचे हाल होताहेत तेच तुमचेही होतील", मुफ्तींचा इशारा
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप प्रसंगी मेहबुबा मुफ्ती बोलताना म्हणाल्या, "आता मोदी म्हणताहेत की, 400 पार. चारशे पार का करायचे आहेत? कारण यांना संविधान बदलायचे आहे. तुमच्या हातातून तुमचा मताधिकार हिसकावून घ्यायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही जागे व्हाल, तुमची यांना सत्तेतून हद्दपार करण्याची इच्छा होईल तेव्हा तुमच्या मतामध्ये ती ताकद राहणार नाही. जसे चीनमध्ये कुणालाही मत दिले तरी एकच व्यक्ती निवडून येतो. तसेच आपले होईल."
"मी जम्मू कश्मीरमधून येते. तिथे संविधान संपले आहे. जम्मू असो कश्मीर असो वा लडाख... तुम्ही पर्यटक म्हणून येता आणि बघता... सगळं ठिक आहे. नाही, काहीही ठिक नाहीये. तुम्ही जाऊन बघा हजारो लोक रस्त्यावर दिसतील. पण कश्मीरमध्ये कुणीही रस्त्यावर येत नाही. जो येतो त्याला तुरुंगात टाकतात. जे हाल आमचे होताहेत, तेच तुमचेही होतील, जर तुम्ही या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान केले नाही, तर...", असे मेहबुबा म्हणाल्या.
- 08:01 PM • 17 Mar 2024प्रकाश आंबेडकर काय बोलले?
"खरगेजी, हिंदू संस्कृतीचा विचार मांडतात. सांस्कृतिक राष्ट्रवादाची सुरुवात आरएसएसने केली. त्यामुळे आपण त्यांना शिकवायला हवे. मी राहुल गांधींना विनंती करतो की, २००४ पासून मी ईव्हीएम विरोधात लढतोय. मागील सहा महिन्यापासून जेव्हा ईव्हीएम चौकशीचा मुद्दा आला, तेव्हापासून निवडणूक आयोग ते टाळतोय."
"निवडणूक सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाला सर्वांनी घेराव घालावा. आपल्याला दिल्लीत जावं लागेल. राहुल गांधींनी तारीख जाहीर केली तर आम्ही त्यात सामील होऊ. हा जो परिवारवाद आहे. आपण त्यातून बाहेर पडायला हवे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण घराणेशाहीसाठी आमची व्होट बँक म्हणून खर्च व्हायला तयार नाही आहोत", असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
- 07:50 PM • 17 Mar 2024भाजपचे लोक शेण हलवा म्हणून खायला देतात; तेजस्वींचा मोदींवर हल्ला
भाजपच्या लोकांपासून सावध रहा. हे लोक शेणाला हलवा म्हणून खायला देतात. मोदीजी, पंतप्रधान आहेत. पण, ते खोटं बोलण्याचा कारखाना आहेत. ते होलसेलर आणि वितरकही आहेत. ते त्यांचे काम आहे. आम्ही खरे बोलणारे लोक आहोत. आम्ही घाबरणार नाही. - तेजस्वी यादव.
- 07:47 PM • 17 Mar 2024शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचे काय झाले? तेजस्वींचा मोदींना सवाल
आमची लढाई मोदी-शाहांसोबत नाही. आम्ही नेहमीच त्या विचाराधारेच्या लोकांशी लढण्याचे काम केले आहे. ज्यांनी आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही. देशात आपला सगळ्यात मोठा शत्रू जर काही असेल, तर बेरोजगारी, महागाई, गरीबी आहे. मोदीजी समुद्रात जातात. कार्पेट टाकून बसतात, त्याची चर्चा होते. पण, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते. १५ लाख देणार होते, त्याचे काय झाले? आम्ही प्रश्न विचारल्यावर आम्हाला शिव्या घातलात. आता भाजपच्या लोकांना एनर्जी ड्रिंक प्यावी लागेल. आम्ही घाबरणारे लोक नाहीत. लढणारे आहोत. - तेजस्वी यादव
- 07:40 PM • 17 Mar 2024तेजस्वी यादवांनी मानले राहुल गांधींचे आभार
"मुंबईत भारत जोडो यात्रेचा समारोप होतोय. संपूर्ण देशात यात्रा केल्याबद्दल राहुल गांधींचे आभार. त्यांनी एक संदेश देण्याचे काम केले आहे. आज एकीकडे द्वेष, तिरस्कार पसरवला जात आहे. देशातील संवैधानिक संस्थांना ताब्यात घेतले जात आहे. ईडी-सीबीआयच्या माध्यमातून लोकांना घाबरवले जात आहे. संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अशावेळी राहुल गांधींनी द्वेषाला पराभूत करून भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी यात्रा केल्याबद्दल आभार मानतो. - तेजस्वी यादव
- 07:08 PM • 17 Mar 2024राहुल गांधी सभास्थळी दाखल, थोड्यावेळात सभेला होणार सुरुवात
भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईच्या शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. या सभास्थळी आता राहुल गांधी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी सभास्थळी हजेरी लावली आहे.
- 07:07 PM • 17 Mar 2024राहुल गांधी, प्रियांका गांधींनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे हेही त्यांच्यासोबत होते.
- 07:05 PM • 17 Mar 2024भारत जोडो न्याय यात्रेतील दृश्य
- 07:02 PM • 17 Mar 2024भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप... शिवाजी पार्कवरील दृश्ये
- 06:37 PM • 17 Mar 2024गांधी, ठाकरे, पवार एकाच मंचावर; महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्रेचा समारोप होत आहे. मुंबईत होत असलेल्या या समारोपाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
या कार्यक्रमानिमित्ताने राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती आहे. मात्र, अद्याप प्रकाश आंबेडकर हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.
- 04:55 PM • 17 Mar 2024उद्धव ठाकरे 'गर्व से कहो हम हिंदू है' कोणत्या तोंडाने म्हणणार..? शिंदेंचा सवाल
"शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. उबाठा गटाचे नंदुरबारचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरेंवर बाण डागले.
"ज्या शिवतीर्थावरून स्वर्गीय बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वरसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली आहे. खरं तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन त्यांना अभिवादन करायला हवे, कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे, त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणं, त्याना शिव्या शाप देणे हे कोणतं हिंदुत्व आहे..? आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
"उद्धव ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है, हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार ? त्यामुळे आजचा दिवस हा शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे", अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण डागले.
"ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम दूर ठेवले. त्यांच्यासोबत बसायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं मत व्यक्त केलं होतं. तेच आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैव आहे", असे शिंदे यांनी म्हटले आहे.
- 02:03 PM • 17 Mar 2024'अडीच वर्षानंतर दोन्ही पक्ष फोडून आलो', फडणवीसांचं सेना, राष्ट्रवादीच्या फुटीवर मोठं विधान
'काँग्रेस नसती तर काय झालं असतं', या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. यावेळी 'मी पुन्हा येईन' याबद्दल तुम्ही ठाम आहात का आणि पुन्हा तसे म्हणणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी पुन्हा येईन ही एक ओळ नव्हती. मी पुन्हा परत कशासाठी येईन, हेही होतं. कुणाच्या सेवेसाठी येईन, महाराष्ट्राला कसं बदलेल, या सगळ्या गोष्टी होत्या. पण, मी पुन्हा येईन ही ओळ जास्त पकडली गेली. माझी ती कविता कुणी बंगालीमध्ये, कुणी इंग्रजीमध्ये भाषांतरीत केली."
"लोकांनी आम्हाला निवडून दिले. हेही खरे आहे की, फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धवजींनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यानंतर आम्ही पुन्हा निवडून आलो. राजकारणात हे सगळं सुरू असते. पण, मी पुन्हा येईन असे मी म्हणालो होतो. त्याला अडीच वर्ष लागले, मात्र त्यानंतर असा आलो की, दोन्ही पक्ष फोडून आलो. आणि दोन्ही पक्ष घेऊन आलो."
- 01:55 PM • 17 Mar 2024अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका
राहुल गांधींच्या रॅलीत एका कार्यकर्त्यांने जितेंद्र आव्हाडांना निळा गमछा दिला, त्यांनी तो फेकून दिल्याच्या प्रकार घडला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याचा निषेध केला आहे. आव्हाड यांनी केलेलं हे कृत्य म्हणजेच त्यांचे मूर्ख प्रदर्शन आहे, असे ते म्हणालेत.
दरम्यान, निळा रंग एका चळवळीचा रंग आहे, अशाप्रकारे बाबासाहेबांच्या आणि त्यांना मानणाऱ्या अनुयायांचा आव्हांडांनी अपमान केलाय. एकीकडे राहुल गांधी रॅलीत निळ्या रंगाचा पट्टा घालून फिरत आहे, तर त्यांना निळ्या रंगाची एलर्जी का ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केलाय.
- 11:54 AM • 17 Mar 2024न्याय शब्दाबद्दल राहुल गांधीनी काय सांगितले?
राहुल गांधी मुंबईत बोलताना म्हणाले, "गेल्यावर्षी आम्ही भारत जोडो यात्रा केली. ४ हजार किमी चाललो. कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंत. मला तर पहिल्यांदा भारताला इतक्या जवळून बघण्याची संधी मिळाली. मी कश्मिरमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या मनात जी भारताची संकल्पना होती, ती वेगळी होती. भारत जोडो यात्रेत मी पाहिलेला भारत वेगळा आहे."
"भारत प्रेमाने राहणारा देश आहे, मग इथे द्वेष का पसरत आहे. तिरस्कार, द्वेष पसरवणे इतकं सोप्पं असायला नको. आपण म्हणतो की, भाजप द्वेष पसरवतोय. पण, याचे काहीतरी मूळ असेलच. हा प्रश्न डोक्यात होता. हळू हळू मला मुद्दा कळला. द्वेषाचे कारण अन्याय आहे. या देशात गरिबांसोबत, शेतकऱ्यांसोबत, महिलांसोबत, दलितांसोबत, तरुणांसोबत... सगळ्यांसोबत दररोज अन्याय होतोय."
"दोन तीन टक्के लोक आहेत देशात, ज्यांना न्याय मिळतो. जास्तीत जास्त पाच टक्के. त्यांच्यासाठी न्यायालये काम करतात, त्यांच्यासाठी सरकारं कामं करतं. सगळ्या संस्थांमध्ये त्यांच्यासाठी जागा आहे. पण, ९० टक्के लोकांना बघू, तर त्यांच्यासोबत २४ तास अन्याय होत आहे. १६ लाख कोटी २०-२५ लोकांचे कर्ज माफ झाले. जीएसटीचा पैसा आहे. जनतेचा पैसा आहे. शेतकऱ्यांचा पैसा आहे. पण, शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ होत नाही."
"मी सरकारमधून बघितलं आहे. जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो आणि आम्ही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडला. तेव्हा प्रतिक्रिया आल्या की, हे चांगलं नाहीये, यामुळे शेतकरी आळशी होतील. मनरेगामुळे गरीब व्यक्तीच्या सवयी बिघडतात. तो काम करतोय. त्याला तुम्ही त्या कामासाठी पैसा देत आहात आणि त्यांची सवय बिघडतेय, असं म्हणतात. दुसरीकडे २०-२५ लोक आहेत, ज्यांचे १६ लाख कोटी माफ होतात, त्यांची सवय बिघडत नाही? ते त्याला विकास म्हणतात, प्रोग्रेस म्हणतात, माहीत नाही काय म्हणतात? तुम्ही जर भारतातील संपत्ती बघितली, तर दिसेल की पूर्ण संपत्ती शेतकरी, आदिवासी, गरीब यांच्याकडून हिसकावून २०-२५ लोकांना दिले जात आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला", असे राहुल गांधी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT