Kunbi Caste Certificate Chhagan bhujbal : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करत छगन भुजबळ एल्गार सभा घेताहेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये, तसेच न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी, अशी मागणी भुजबळांनी केलीये. त्यांच्या मागणीवर शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी या छगन भुजबळांच्या मागणीवर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “छगन भुजबळ भाषणामध्ये काय बोलले माहिती नाही. पण, मला त्यातील छोटी माहिती आता मिळाली की, भुजबळांचं म्हणणं असं आहे की, कुणबी पुरावे शोधण्यासाठी जी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ती समिती बरखास्त करा.”
“हा निर्णय कुणी एकट्याने घेतलेला नाही. हा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने, सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन एकत्रित विचाराने घेतलेला निर्णय आहे. याबद्दल आता भुजबळांचं काही वेगळं मत बनलं असेल म्हणजे निर्णय घेताना वेगळं मत असेल आणि आता वेगळं मत झालं असेल, तर त्याला प्लॅटफॉर्म हा मुख्यमंत्र्यांजवळ बोलण्याचाच आहे”, अशी भूमिका शंभूराज देसाई यांनी मांडली.
भुजबळांनी शिंदे, पवार, फडणवीसांची भेट घ्यावी
शंभूराज देसाई म्हणाले, “ज्या गोष्टी धोरणात्मक असतात. मंत्रिमंडळामध्ये झालेल्या चर्चा या उघडपणे बाहेर सांगायच्या नसल्या तरी सुद्धा मंत्रिमंडळाने एका विचाराने निर्णय घेतला. त्या बैठकीला भुजबळ होते. त्यांच्या उपस्थितीत तो निर्णय झाला. आता जर त्यांना काही वेगळं मत मांडायचं असेल, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी. त्यांनी त्यांचं मत मांडावं.”
हेही वाचा >> टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज बनला गुजरात टायटन्सचा कर्णधार
“आता उद्या मंगळवारी आहे. मंत्रिमंडळाची बैठक असते. त्या बैठकीत त्यांना काही म्हणायचं असेल, तर ते बोलतील… आम्हाला काही बोलायचं असेल, तर आम्ही बोलू. त्यामुळे ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांजवळ बोलायच्या आहेत. त्या भाषणातून बोलणं मला तरी योग्य वाटत नाही”, असे म्हणत शंभूराज देसाईंनी भुजबळांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
भुजबळ कुठल्या आधारावर बोलताहेत?
मराठा समाजातील लोकांना दिली जाणारी कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणीही भुजबळांनी केलीये. त्यावर शंभूराजे देसाई म्हणाले, “भुजबळ हे कुठल्या आधारे म्हणताहेत मला माहिती नाही. पण, ज्यावेळी हा विषय चर्चेला आला, त्यावेळी काय ठरलं? मराठवाड्यापुरता हा विषय पुढे आला होता”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
“मराठवाड्यात निजामाचं राज असल्यामुळे मूळ कागदपत्रं मिळत नव्हते. ज्यांनी ते जतन करून ठेवले होते. त्यांना तसे दाखले मिळाले. जरांगे पाटलांनी असं सांगितलं की, आमच्या भावांकडे आहे, पण आमच्याकडे नाही. आमचीही तीच वंशावळ आहे. त्यामुळे जुनी वंशावळ, वारसाच्या नोंदी शोधायचं काम सुरू झालं. त्यासाठी प्रक्रिया काय असावी, यासाठी शिंदे समिती स्थापन केली गेली”, अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली.
हेही वाचा >> महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?
“रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणबी नोंद आढळली असेल, तर ते कुणबीच आहेत ना? आपण काहीही नवीन करत नाही. ज्यांचे अनावधानाने कागदपत्रं मिळाले नाही, त्यांचे आता मिळताहेत. त्यासाठी शोध मोहीम घेतोय. त्यामुळे ज्यांना पूर्वी मिळत नव्हते, त्यांना आता मिळायला लागले आहेत. पुराव्यासह मिळणारे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करा म्हणणं मला तरी योग्य वाटतं नाही”, असे सांगत शंभूराज देसाईंनी भुजबळांना सुनावलं.
ADVERTISEMENT