देशात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला असून, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात एकमत नसल्याचे समोर आले. अजित पवार आणि शरद पवार यांच्या परस्परविरोधी राजकीय भूमिकांची चर्चा होत असतानाच हा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या दोन नेत्यांबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत इतर मुद्द्यांबरोबरच ईव्हीएमचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमबद्दल असलेल्या शंकाचं पत्रही केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं आहे. विरोधकांच्या या आक्षेपांवर सत्ताधारी नेत्यांकडून टीका होत असताना, या मुद्द्यावर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पक्षातील शरद पवार आणि अजित पवारांचंच एकमत नसल्याचं समोर आलं.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर शरद पवार काय म्हणाले, ते वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “ईव्हीएम मशीनसंदर्भात खुपदा आमच्या लोकांची तक्रार आहे, ती तक्रार खरी नाही हे दाखवण्यासाठी निवडणूक आयोग अशा पद्धतीने काम करतं. समजा माझा मतदारसंघ आहे, तिथे काही चुकीचं करणार नाही. तिथे निकाल लागला चांगला की सांगणार यांच्या मतदारसंघात हे निवडून आले, तेव्हा मशीन चांगले होते. दुसऱ्या मतदारसंघात वेगळा निकाल लागला की, तक्रार करतात.”
पुढे पवार म्हणाले, “प्रश्न असा आहे की त्यामध्ये जी चीप टाकतात, त्या चीपबद्दल काही तज्ज्ञांना शंका आहे. म्हणून आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र बसलो आणि त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित केले. ते निवडणूक आयोगाकडे दिले. याचा खुलासा करा. आमची शंका दूर करा, आमची काहीच तक्रार नाही. पण, ती दूर न करता निवडणूक तुम्ही घेतली, तर शंकेला जागा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
आता अजित पवार यांनी ईव्हीएम मशीनबद्दल काय म्हटलंय, ते वाचा…
ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. जर ईव्हीएममध्ये दोष असता, तर छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात विरोधी पक्षाची सरकारं नसती. आपल्या देशात ईव्हीएममध्ये छेडछाड करणे शक्य नाही. ही खूप मोठी प्रणाली आहे आणि पडताळणी, समतोल ठेवणाऱ्या गोष्टी यामध्ये आहेत.”
शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेवर राज्यातील शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष काय भूमिका मांडतात, हे महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT