Harshvardhan Patil joins NCP-SP: इंदापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला एकापाठोपाठ हादरे देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी विरोधकांच्या गडांना सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आज (4 ऑक्टोबर) भाजपमधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (sharad pawar big blow to bjp devendra fadnavis harshvardhan patil joins ncp sharadchandra pawar party)
ADVERTISEMENT
हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयामुळे भाजपला इंदापूर मतदारसंघात मोठा फटका बसू शकतो. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> Gold-Silver Price: सोन्याचा तर विषयच हार्ड! किंमतीही धमाकेदार... आजचे भाव किती रूपयांनी वाढले?
...म्हणून मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय!
'मी चार-पाच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलो. दीड-दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा सगळ्या राजकीय भूमिकेसंदर्भात झाली. त्यांनी पण काही प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले. मी पण माझी भूमिका ठेवली.'
'शेवटी चर्चेअंती त्यांनी सांगितलं की 'आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे ती महायुतीमधील जे कोणी विद्यमान आमदार असतील हे तेच लढवणार. दुसरा काही पर्याय आपण तुमच्याबाबत काढू.'
हे ही वाचा>> Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?
'मात्र दुसरा जो पर्याय होता तो व्यक्तीश: माझ्या सर्व कार्यकर्त्यांची संमती नव्हती. व्यक्तीश: मलाही दुसरा कोणता पर्याय स्वीकारणं हे कदाचित संयुक्तिक ठरलाही असता पण राजकारण, समाजकारणात आपल्या वैयक्तिक गोष्टींपेक्षा आपल्या मागे जी जनता उभी राहते त्या जनतेचा प्रश्न असतो.'
'म्हणून त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मला परवा पवार साहेबांचा निरोप आला की, सिल्व्हर ओकला भेटायला या. काल पवार साहेबांबरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली. ज्यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.'
'पवार साहेबांनी सांगितलं की, इंदापूर मतदारसंघाचा कानोसा घेतला आहे. जर तुमच्याही कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तुम्हीही आमच्या पक्षात यावं. अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह धरला.. खासदार सुप्रिया ताईंनी आग्रह धरला.'
'मी सांगितलं की, इंदापूरला जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. त्यानुसार मी कार्यकर्त्यांशी आज चर्चा केली. आता सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी त्यांची इच्छा आहे.'
'यामुळे मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की, मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतो.' अशी घोषणा ही हर्षवर्धन पाटलांनी पत्रकार परिषदेत केली.
ADVERTISEMENT