Jayant Patil: “राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार”

मुंबई तक

• 03:38 PM • 03 Nov 2022

रोहित वाळके, प्रतिनिधी, अहमदनगर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा ते कधी पडणार याच्या तारखा वारंवार भाजपकडून दिल्या जात होत्या. महाविकास आघाडीने तरीही अडीच वर्षे पूर्ण केली. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या सरकाला शंभर दिवस पूर्ण झालेले […]

Mumbaitak
follow google news

रोहित वाळके, प्रतिनिधी, अहमदनगर

हे वाचलं का?

महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा ते कधी पडणार याच्या तारखा वारंवार भाजपकडून दिल्या जात होत्या. महाविकास आघाडीने तरीही अडीच वर्षे पूर्ण केली. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या सरकाला शंभर दिवस पूर्ण झालेले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकार कधी पडणार हे सांगून टाकलं आहे.

काय म्हटलं आहे जयंत पाटील यांनी?

राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत मंथन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला शुक्रवारपासून सुरूवात होते आहे. शिबीर झाल्यानंतर राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर मविआ सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतलं शिबीर झाल्यावर हे सरकार पडेल असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

सुजय विखे पाटील यांच्या टीकेलाही उत्तर

खासदार सुजय विखे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं होतं. त्या टीकेलाही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी हा राज्यातला सर्वात खंबीर पक्ष आहे. हा पक्ष फुटणार नाही. आपल्या गावाचा असा पायगुण आहे हे स्वतःच जाहीर करणं हे यासाठी खासदाराचं कौतुक वाटतं असं म्हणत जयंत पाटील यांनी सुजय विखेंनाही उत्तर दिलं आहे.

21 जून २०२२ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेतले ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आधी सुरत आणि त्यानंतर हे सगळेजण गुवाहाटीमध्ये गेले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सरकार कोसळलं. त्यानंतर ३० जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता जयंत पाटील यांनी हे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन संपल्यावर कोसळेल असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

    follow whatsapp