Ashok Chavan Srijaya Chavan : अचानक काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडण्याचं कारण यावेळी चव्हाणांनी मात्र सांगितलं नाही. महाविकास आघाडीमध्ये चव्हाणांना नांदेडची लोकसभेची जागा लढवण्यास दिली जाण्याची शक्यता होती. आता चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार, हे जवळपास निश्चित असून, त्यांच्या कन्येचीही राजकीय एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात आहे. कारण आता भोकरची विधानसभेची जागा कोण लढवणार? असा प्रश्न आहे.
ADVERTISEMENT
भारत जोडो यात्रेपासून चर्चेत असलेली अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण हिला विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीजयाची कारकिर्द नेमकी कशी आहे, श्रीजया वडिलांची जागा घेणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभाग
राहुल गांधींची पहिली भारत जोडो यात्रा मराठवाड्यातून गेली होती. यावेळी देगलूरपासून श्रीजया चव्हाण राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासोबतचा श्रीजया यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच श्रीजया हिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.
भारत जोडो यात्रेच्या मराठवाड्यातील प्लॅनिंगमध्ये श्रीजया यांचा सक्रीय सहभाग होता. श्रीजयांच्या या सहभागाबाबत अशोक चव्हाण यांनी सूचक ट्विट देखील त्यावेळी केलं होतं.
श्रीजयाचे किती झाले आहे शिक्षण?
श्रीजया यांची कारकिर्द कशी राहिली आहे ते पहा. श्रीजया यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाचं सर्व काम श्रीजया सांभाळत होत्या. त्याचबरोबर ज्यावेळी २०१९ च्या निवडणुकीत चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यावेळी श्रीजया यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं होतं. ज्यावेळी अशोक चव्हाण यांनी भोकरदनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा श्रीजया यांनीच सांभाळली होती. त्यामुळे पुढच्या काळात श्रीजया या सक्रीय राजकारणत उतरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
त्यातच श्रीजया या अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून आल्या होत्या. श्रीजया यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भावी आमदार असे फ्लेक्स देखील कार्यकर्त्यांनी लावले होते. त्यामुळे श्रीजयांचा राजकीय प्रवेश निश्चित मानला जात होता. अशोक चव्हाण लोकसभा लढवणार आणि श्रीजया या भोकरमधून विधानसभा लढवतील असं समिकरण जवळपास निश्चित झालं होतं.
आता अशोक चव्हाण भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भोकरची विधानसभेची जागा रिक्त होणार आहे. त्या जागेवर आता श्रीजया यांना भाजपकडून संधी मिळू शकते. श्रीजया हिने राजकारणत यायचं कि नाही याचा निर्णय तिने घ्यायचा आहे असं अशोक चव्हाण एका मुलाखतीत म्हणाले होते. आता अशोक चव्हाण राज्यसभेवर जाण्याची शक्यता असल्याने श्रीजया यांना ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
एकीकडे भाजप काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत असताना श्रीजया यांना विधानसभेची संधी देणार का असा प्रश्न आहे. अर्थात घोड मैदान दूर नाहीये, आणि सध्याचं राजकारण पाहता कधी काहीही होऊ शकतं हे तर स्पष्ट आहे.
ADVERTISEMENT