Yugendra Srinivas Pawar: बारामती: महाराष्ट्रात सातत्याने राजकीय भूकंप घडत आहेत. अशातच राज्यातील पवार कुटुंब हे सध्या या राजकीय भूकंपाच्या सतत केंद्रस्थानी आहेत. त्यातच आता युगेंद्र पवार या तरुण नेत्याच्या एंट्रीने बारामतीत (Baramati) एका नव्याच राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता हे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) नेमके कोण आणि त्यांच्या राजकारणातील एंट्रीने नेमकी राष्ट्रवादीतील गणितं कशी बदलणार हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (will be by his nephew who is yugendra pawar)
ADVERTISEMENT
बारामतीत काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले की, "माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा', त्यांच्या या विधानाला काही दिवसही लोटले नाही तोच आता अजितदादांच्या सख्ख्या पुतण्याने म्हणजेच युगेंद्र पवार यांनी थेट आव्हान उभं केलं आहे.
पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे सध्याच्या घडीला सक्रीय राजकारणात आहेत. मात्र, असं असलं तरीही संपूर्ण पवार कुटुंब हे या नाही तर त्या कारणाने राज्यातील राजकारणाशी जोडलेलं आहे. मग ते सहकार क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र किंवा क्रीडा संघटना.. यामध्ये पवार कुटुंबातील एक तरी व्यक्ती असल्याचं पाहायला मिळतंय..
अशातच युगेंद्र पवार हे आता आपल्या काकांच्या बाजूने नव्हे तर आपल्या आजोबांच्या बाजूने ठामपणे उभं राहणार असल्याचं समोर आल्याने बारामतीत मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
सगळ्यात आधी आपण हे पाहुयात की, युगेंद्र पवार हे अचानक चर्चेत आले तरी कसे..
एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, 'मी कोणाचा विरोध करायचा म्हणून नाही तर शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी आलो आहे. मी बारामतीमध्ये साहेब सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करेन', असं म्हणत युगेंद्र पवार यांनी ते कोणत्या बाजूला आहेत हे स्पष्ट करून टाकलं आहे.
दुसरीकडे युगेंद्र पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधातील उमेदवार असतील, अशीही चर्चा सध्या बारामतीत सुरूय. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या हा संघर्षही बघायला मिळू शकतो.
दादांना आव्हान देणारे कोण आहेत युगेंद्र पवार?
आतापर्यंत पवार घराण्यातील चार ते पाच नावंच राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत होती. पण आता अचानक युगेंद्र पवार हे चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. याच भेटीनंतर युगेंद्र पवार हे पवारांच्या गटात जाणार अशा चर्चा होत्या. त्यावेळी युगेंद्र पवार म्हणालेले की, 'मी काही आजोबांना पहिल्यांदा भेटत नाहीए, आम्ही राजकारण आणि कुटुंब वेगळं ठेवतो...'
पण अस असलं तरीही पवार कुटुंबात नेहमीच राजकीय डावपेच आखले जातात आणि त्याभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतं हे काही आपल्याला नव्याने सांगायला नको..
युगेंद्र पवार हे तरुण आणि तडफदार आहेत. मुळात ते उद्योजक आहे.. परदेशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण देखील घेतलं आहे. त्यामुळेच स्वत: शरद पवार यांनी त्यांना विद्या प्रतिष्ठाणच्या कामात सहभागी करून घेतलं. ते बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या खजिनदार या अत्यंत महत्त्वाच्या पदावर आजही कार्यरत आहेत. याशिवाय बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देखील आहेत. तसेच शरयू उद्योग समूहाचे सीईओ देखील आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी जोडले गेलेले आहेत. म्हणजेच राजकारणासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्यांच्याकडे आपसूच आहेत.
युगेंद्र पवार हे सक्रीय राजकारणात नव्हते. मात्र, जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हा आपल्या काकांऐवजी आजोबांना साथ द्यायची हे युगेंद्र पवार यांनी ठरवलं. ज्याची सुरुवात त्यांनी पहिल्यांदा बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्त्यांचे आयोजित करून केलं होतं. कारण या कार्यक्रमाला युगेंद्र पवार यांनी थेट शरद पवारांनाच निमंत्रित केलेलं.
त्यांच्या याच कृतीची राज्यभर चर्चा झालेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा युगेंद्र पवार हे थेट आपले चुलते अजित पवार यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटून त्यांना पाठबळ देणार आहेत. जे येत्या काळात अजित पवारांसाठी नक्कीच अडचणीचं ठरू शकतं...
ADVERTISEMENT