Baramati Lok Sabha 2024 Election : (वसंत पवार, बारामती) महाराष्ट्रात लोकसभेची सर्वात हायव्होल्टेज लढत बारामती मतदारसंघात बघायला मिळणार असंच दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडी घडत असून, आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच सुप्रिया सुळेंविरुद्ध मैदानात असणार, हे चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. बारामतीत लोकसभा मतदारसंघात नेमकं काय राजकारण घडतंय आणि त्याचे अर्थ काय, हेच जाणून घ्या...
ADVERTISEMENT
अजित पवार बारामतीतून आपला खासदार जिंकून आणण्याचा निर्धार बोलून दाखवत आहेत. पण, त्यांचा उमेदवार कोण असणार? एका कार्यक्रमात अजित पवारांनी मीच उमेदवार आहे, असं समजून मतदान करा असं सांगितलं. पण, यानंतर जे नाव चर्चेत आलं, ते सुनेत्रा पवार यांचं.
कुल कुटुंब आणि अजित पवार कुटुंबातील भेटीगाठी
सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार या चर्चेला हवा मिळाली, ती प्रचाररथ आणि झळकलेल्या बॅनर्संनी. सुनेत्रा पवारांचे बॅनर्स बारामतीत लावण्यात आले. त्यानंतर एका भेटीने पुन्हा सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आलं. २०१९ मध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या कांचन कुल यांनी काही दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार राहुल कुलही होते.
सुनेत्रा पवारांचं भाषण...
सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारचं असणार या शक्यतांना आणखी बळ मिळाले ते सुनेत्रा पवार यांच्या भाषणाने. बारामतीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवारांनी जे भाषण केलं.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेम करता. हे प्रेम असंच उदंड राहणार आहे, याची मला खात्री आहे. हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहू द्या. तुमचे हे प्रेमच माझी ऊर्जा असणार आहे. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. अजित पवार यांच्यावर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रेम करता. ते तुमचेच आहेत. मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावला. याला उतराई होण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू."
पुढे त्या असंही म्हणाल्या की, "अजित पवार यांना अशीच साथ देण्याची गरज आहे. भविष्यातही तुम्ही ही साथ देणार, याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मलाही खूप प्रेम दिलं. त्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल, अशी आशा बाळगते."
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, बॅनर्स आणि प्रचाररथ फिरत असताना सुनेत्रा पवारांनी केलेलं हे विधान सुरू असलेल्या चर्चेला अप्रत्यक्षपणे दुजोरा देणार ठरलं आहे.
राहुल कुल काय म्हणाले?
"सुनेत्रा वहिनी आणि आमची जी भेट झाली. ती कौटुंबिक भेट होती. यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या स्तरावर जी केंद्रातील मंडळी निर्णय घेतील, तो स्वीकारून आम्ही पुढे जाणार आहोत", असं राहुल कुल म्हणाले.
ही जागा तुम्ही सोडली आहे का? तुमचा दावा नाही का? असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले की, "हा माझा विषयच नाहीये. मागच्या वेळी जागा होती. त्यावेळी समीकरणं वेगळी आहेत. यावेळी समीकरणं खूप बदलली आहेत, त्यामुळे बारामतीची जागा कुणाकडे जाईल, हे आधी ठरेल आणि त्यानंतरच उमेदवारीची चर्चा केलेली बरी राहील", असं सांगत आमदार राहुल कुल यांनी जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असेच संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याचीच दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT