इंग्लंडच्या मैदानात इंग्लंडचा पराभव, वाडेकरांच्या भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला ५० वर्ष पूर्ण

मुंबई तक

• 09:01 AM • 24 Aug 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये धडाकेबाज कामगिरी करतो आहे. नुकताच भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात, इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजण्याची धमक आता भारतीय संघात आलेली आहे. परंतू एक काळ असा होता की भारतीय संघाचा परदेश दौरा […]

Mumbaitak
follow google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये धडाकेबाज कामगिरी करतो आहे. नुकताच भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात, इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजण्याची धमक आता भारतीय संघात आलेली आहे.

हे वाचलं का?

परंतू एक काळ असा होता की भारतीय संघाचा परदेश दौरा म्हटला की पराभव हा जवळपास निश्चीत मानला जायचा. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज हे संघ त्यावेळचे दादा संघ मानले जायचे. परंतू १९७१ साली भारतीय संघाने इतिहास रचून सर्व जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडली. इंग्लंडला त्यांच्यात मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत करुन अजित वाडेकर यांच्या भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटी सामना आणि पर्यायाने मालिका जिंकली होती.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील लॉर्ड्सची पहिली आणि ओल्ड ट्रॅफर्डची दुसरी कसोटी भारताने अनिर्णीत राखली, मग केनिंग्टन ओव्हलच्या तिसऱ्या कसोटीत निर्णायक विजय मिळवत मालिकेवर १-० असे वर्चस्व गाजवले. २४ ऑगस्ट, २०२१ या दिवशी भारताने तो ऐतिहासिक विजय साकारला होता, आज त्या घटनेला ५० वर्षे होत आहेत. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी मैदानावर अभूतपूर्व जल्लोश साजरा केला.

दिलीप सरदेसाई, एस.व्यंकटराघवन, गुंडप्पा विश्वनाथ, बिशनसिंग बेदी, फारुख इंजिनीअर, सुनील गावस्कर हे भारतीय संघाच्या या ऐतिहासीक विजयाची शिल्पकार मानले जात होते. कर्णधार अजित वाडेकरांनी भारताकडून सर्वाधिक २०४ रन्स केल्या. गोलंदाजीत फिरीकीपटू व्यंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर यांनी प्रत्येकी १३ बळी घेतले. कोणीही फारशी अपेक्षा केलेली नसताना भारतीय संघाने त्यावेळी इतिहास रचून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं. जाणून घेऊया या मालिकेतल्या तिन्ही कसोटी सामन्यांचा थोडक्यात इतिवृत्तांत….

१) पहिला कसोटी सामना – २२ ते २७ जुलै १९७१ (लॉर्ड्स)

अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १८३ धावांचं आव्हान होतं. भारताला विजयासाठी ३८ धावांची आणि इंग्लंडला २ बळींची आवश्यकता असताना पावसामुळे हा रंगतदार सामना अनिर्णीत राहिला. इंग्लंडची पहिल्या डावात ७ बाद १८३ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना वेगवान गोलंदाज जॉन स्नो याने ७३ धावांची खेळी साकारत इंग्लंडला ३०४ धावसंख्येपर्यंत नेले. बेदीने चार बळी घेत इंग्लंडवर अंकुश ठेवला. मग वाडेकरच्या ८५ धावांमुळे भारताने ३१३ धावसंख्येचे चोख प्रत्युत्तर दिले. नंतर वेंकटराघवनच्या फिरकीपुढे इंग्लंडचा दुसरा डाव १९१ धावांवर आटोपल्यावर भारताची २ बाद २१ अशी अवस्था झाली होती. परंतू गावस्कर (५३ रन्स) आणि इंजिनीयर (३५ रन्स) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचत भारताला आशा दाखवली. हे दोघे बाद झाल्यावर नॉर्मन गिफोर्डच्या गोलंदाजीपुढे भारताची घसरगुंडी उडाली. पण सरतेशेवटी पावसाने हा सामना अनिर्णीत राखला.

२) दुसरा कसोटी सामना – ५ ते १० ऑगस्ट १९७१ (ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)

ओल्ड ट्रॅफर्डच्या दुसऱ्या कसोटीचा निकालही अनिर्णीतच लागला. पाचव्या दिवशी सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे भारताचा पराभव टळला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३८६ धावा उभारल्या. त्यापुढे भारताचा डाव २१२ धावांत कोसळला. यात गावस्कर आणि एकनाथ सोलकरच्या अर्धशतकांचे महत्त्वाचे योगदान होते. इंग्लंडने ब्रायन लकहर्स्टच्या (१०१) शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात ३ बाद २४५ धावसंख्येवर डाव घोषित करून भारतापुढे विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसअखेरीस भारताची ३ बाद ६५ अशी स्थिती होती. अशोक मंकड, गावस्कर, वाडेकर माघारी परतले होते. परंतु पावसाने इंग्लंडचा विजयाचा घास हिसकावून घेतला.

३) तिसरा कसोटी सामना – १९ ते २४ ऑगस्ट १९७१ (केनिंग्टन ओव्हल)

अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये अपेक्षेप्रमाणेच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅलन नॉटच्या ९० धावांमुळे पहिल्या डावात ३५५ धावा उभारल्या. सोलकरने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने २८४ धावांपर्यंत मजल मारली. इंजिनीयरने ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. पहिल्या डावात ७१ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतरही भारताने सामन्यावर पकड घट्ट करताना इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १०१ धावांत गुंडाळला. यात मालोची भूमिका बजावली ती म्हणजे भागवत चंद्रशेखर यांनी…चंद्रशेखरने ३८ धावांत ६ बळी घेत इंग्लंडला एकामागोमाग एक धक्के दिले. यानंतर १७३ धावांचे विजयी लक्ष्य भारताने सहा फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यानंतर संपूर्ण देशात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय संघाच्या या विजयात कर्णधार अजित वाडेकर (४५), सरदेसाई (४०) आणि विश्वनाथ (३३) यांचे महत्त्वाचे योगदान होते.

    follow whatsapp