कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने हा सामना तात्काळ रद्द केला. परंतू देशातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका आता आयपीएललाही बसला आहे. KKR आणि CSK पाठोपाठ सनराइजर्स हैदराबाद संघातल्या वृद्धीमान साहालाही कोरोनाची लागण झाली आहे. ज्यानंतर बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ANI शी बोलताना माहिती दिली.
ADVERTISEMENT
हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने वृद्धीमान साहाला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. ज्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आयपीएलचे सामने खेळवले जाणं गरजेचं आहे का असा प्रश्न विचारला जात होता. त्यातच बायो सिक्युरअ बबल असतानाही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयच्या आयोजनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित करण्याचं ठरवलं आहे.
दरम्यान आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि बीसीसीआयनेही यासंदर्भात अधिकृत घोषणा जाहीर करत आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतर सदस्यांची तब्येत चांगली राहणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता खेळाडूंचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी बीसीसीआयने यंदाचे आयपीएलचे सामने तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात खडतर काळ असताना आम्ही लोकांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे आणायचा प्रयत्न केला, परंतू सध्याची परिस्थिती पाहता सामने स्थगित करणं हाच योग्य पर्याय दिसतो आहे. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांच्या घरी सुखरुप पोहचतील याची आम्ही काळजी घेऊ असंही बीसीसीआयने सांगितलं आहे.
दरम्यान KKR च्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचे CEO काशी विश्वनाथन, बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी आणि संघाला मैदानात ने-आण करणाऱ्या बसचा क्लिनर यांना कोरोनाची लागण झाली आहे. ESPNCricinfo ने मिळालेल्या संघातील इतर सदस्य आणि खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आहे. रवीवारी करण्यात आलेल्या चाचणीनंतर संघातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT