टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या नीरज चोप्राने इतिहास घडवला. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या स्पर्धेसाठी उतरलो तेव्हा माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी करू असा विचार होता पण गोल्ड मेडल जिंकण्याचा विचार नव्हता असं म्हणत नीरज चोप्राने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या शिरपेचात सुवर्णतुरा खोवणाऱ्या नीरजने ही प्रतिक्रिया दिली आहे. 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर 13 वर्षांनी आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
ADVERTISEMENT
जर्मनी, चेक रिपब्लिक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरज चोप्राने 87.58 मीटर लांब भाला फेकत पदकाचा सुवर्णवेध केला.
सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया
‘मला माहित होतं की मी आज वेगळं काहीतरी करणार आहे. मात्र मी गोल्ड मेडल मिळेल असा विचार करत नव्हतो. पात्रता फेरीत मी चांगला थ्रो केला होता. त्यामुळे मला हे माहित होतं की अंतिम फेरीत मी चांगली कामगिरी करणार. मला सुवर्णपदक मिळालं आणि राष्ट्रगीताची धून वाजली आणि तिरंगा फडका.. माझ्या शरीरात एक आनंदाची लहर उमटली आणि डोळ्यात आनंदाश्रू. माझा विश्वास बसत नाही.. अॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदा भारताने सुवर्णपदक जिंकलं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे.’
पानिपतच्या २३ वर्षीय नीरज चोप्राने आपलं मेडल मिल्खा सिंग यांना बहाल केलं आहे. मी मेडल त्यांना दाखवू इच्छित होतो. त्यांना भेटण्याची इच्छा होती असंही नीरजने म्हटलं आहे.
नीरजच्या काकांनी काय म्हटलं आहे?
नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याचे काका सुरेंद्र चोप्रा म्हणाले की मी त्याच्यासाठी टॉर्चरवाला काका होतो कारण मी त्याला झोपेतून लवकर उठवत असे. आज मागे वळून पाहताना आनंद होतो आहे. मात्र आमची कायम हीच इच्छा होती की तो फिट अँड फाईन असावा. त्याला ट्रेनिंगसाठी आम्ही मैदानात घेऊन जात होतो. तो परत आला की चूरमा खायचा. 13 वर्षाच्या वयातच तो 80 किलो होता. पण त्याला आम्ही ट्रेनिंग दिलं आज त्याने इतिहास घडवला आम्हाला याचा प्रचंड आनंद आहे.
ADVERTISEMENT