India Vs South Africa, Rohit Sharma: मुंबई: दक्षिण अफ्रिका (South Africa) दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील सराव सत्रादरम्यान भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली आहे. त्याची ही दुखापत खूप गंभीर असल्याचं समजतं आहे. त्यामुळेच रोहित शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळचा (Priyank Panchal) कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
प्रियांक पांचाळ हा भारत ‘अ’ संघाचा कर्णधार आहे. भारत-अ संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. जिथे तो कसोटी मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत प्रियांक पांचाळ तिथूनच भारतीय संघात सामील होणार आहे.
रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली आहे. मुंबईत सराव सुरू असताना रोहित शर्माला दुखापत झाली होती.
अशा स्थितीत तो तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, रोहित शर्मा वनडे मालिकेपर्यंत तंदुरुस्त राहू शकेल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रोहित शर्माला दुखापत कशी झाली?
रोहित शर्मासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा होता, कारण त्याला कसोटी संघात उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यासोबतच टी-20 आणि वनडेचे कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, मुंबईतील सराव सत्रादरम्यान झालेल्या दुखापतीने संपूर्ण चित्रच पालटले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठी तरी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार नसल्याचं सध्या दिसतं आहे.
कॅप्टन्सी सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी, Virat कडून तरीही निर्णय न आल्याने BCCI कडून नेतृत्वबदल
मुंबईत सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा फलंदाजी करत होता. त्यावेळी थ्रो-डाऊन तज्ज्ञ रघूचा एक चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यानंतर रोहित शर्मा अजिबात फलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे त्याला सराव सत्र देखील सोडून माघारी यावं लागलं. सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहित शर्मावर लक्ष ठेवून आहे.
भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा हा 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 26 तारखेला सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे, तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीला आणि तिसरा सामना 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
कसोटी मालिकेनंतर भारताला तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळायची आहे. जी 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 21 आणि 23 जानेवारीला शेवटचे दोन वनडे खेळवले जातील.
ADVERTISEMENT