शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय खेळाडूंच्या संघाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. कोलंबोच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने श्रीलंकेचं आव्हान ७ विकेट राखून पूर्ण केलं. कॅप्टन शिखर धवनची नाबाद ८६ रन्सची इनिंग आणि डेब्यू केलेल्या इशान किशनने केलेली हाफ सेंच्युरी ही भारताच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली.
ADVERTISEMENT
भारताने या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला संधी दिली. टॉस जिंकत श्रीलंकेचा कॅप्टन दसून शनकाने बॅटींगचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो आणि मिनोद भनुका जोडीने श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू चहलने ही जोडी फोडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे बॅट्समन विकेट फेकत राहिले.
प्रदीर्घ कालावधीने आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळणाऱ्या ‘कुलचा’ (कुलदीप-चहल) जोडीने आश्वासक मारा केला. मधल्या फळीत असलंका आणि कॅप्टन शनकाने महत्वाच्या रन्स केल्या. यानंतर अखेरच्या फळीत चमिका करुणरत्नेने ४३ रन्सची इनिंग खेळत श्रीलंकेला २६३ रन्सपर्यंत मजल मारुन दिली. भारताकडून कृणाल पांड्याने टिच्चून मारा केला. दीपक चहर-चहल आणि कुलदीप यादव या त्रिकुटाने २-२ विकेट घेतल्या. याव्यतिरीक्त पांड्या बंधूंनी १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली. मुंबईकर पृथ्वी शॉने सुरुवातीच्या ओव्हरपासून फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने २४ बॉलमध्ये ९ चौकारांची बरसात करत ४३ रन्स केल्या. धनंजय डी-सिल्वाने त्याला आऊट केलं. यानंतर डेब्यू करणाऱ्या इशान किशननेही आपली चमक दाखवत मैदानात फटकेबाजीला सुरुवात केली. एका बाजूला कॅप्टन शिखर धवन संयमी इनिंग खेळत एक बाजू लावून होता.
डेब्यू टी-२० मॅचमध्ये हाफ सेंच्युरी केल्यानंतर इशान किशनने वन-डे सामन्यातही याच विक्रमाची नोंद केली. ४२ बॉलमध्ये ८ फोर आणि २ सिक्स लगावत इशान किशनने ५९ रन्स केल्या. यानंतर कॅप्टन शिखर धवनने आधी मनिष पांडे आणि नंतर सूर्यकुमार यादवसोबत छोटेखानी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT