अटीतटीच्या मॅचमध्ये भारताचा विजय, मालिकाही जिंकली

मुंबई तक

• 05:05 PM • 28 Mar 2021

पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडची झुंज मोडून काढत भारतीय संघाने ७ रन्सने सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने ३ वन-डे मॅचची सिरीज २-१ ने जिंकली असून या दौऱ्यावर भारताचं पूर्णपणे निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. टेस्ट सिरीजनंतर, टी-२० आणि वन-डे मध्ये भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३३० रन्सचा […]

Mumbaitak
follow google news

पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडची झुंज मोडून काढत भारतीय संघाने ७ रन्सने सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने ३ वन-डे मॅचची सिरीज २-१ ने जिंकली असून या दौऱ्यावर भारताचं पूर्णपणे निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. टेस्ट सिरीजनंतर, टी-२० आणि वन-डे मध्ये भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३३० रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडने ३२२ पर्यंत मजल मारली. अखेरच्या फळीत सॅम करनने ९५ रन्सची इनिंग खेळत भारताच्या नाकीनऊ आणले होते…पण सरतेशेवटी नटराजनने शेवटच्या ओव्हरमध्ये भेदक मारा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे वाचलं का?

३३० रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही बॅट्समनना स्वस्तात आऊट करत इंग्लंडला धक्के दिले. यानंतर बेन स्टोक्स आणि ड्वाइड मलान यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतू नटराजनने स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. यानंतर मलानच्या हाफ सेंच्युरीचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही बॅट्समन मैदानावर तग धरु शकला नाही. ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट जात असताना भारत हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. परंतू ८ बाद २५७ वरुन सॅम करनने नवव्या विकेटसाठी मार्क वूडच्या सहाय्याने ६० रन्सची पार्टनरशीप करत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं.

विशेषकरुन सॅम करनने अत्यंत सफाईदार पद्धतीने खेळ करत चांगली फटकेबाजी केली. भारतीय बॉलर्सवर दडपण आणण्यात करनला यश आलं. त्यातच भारतीय फिल्डर्सनी काही सोपे कॅच सोडून इंग्लंडला मदतच केली. परंतू अखेरच्या ओव्हरमध्ये मार्क वूड चोरटी रन घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला आणि इंग्लंडची जमलेली जोडी फुटली. यानंतर करनने फटकेबाजीचा प्रयत्न केला परंतू त्याचे हे प्रयत्न तोकडेच पडले. त्याने ८३ बॉलमध्ये ९ फोर आणि ३ सिक्स लगावत नॉटआऊट ९५ रन्सची इनिंग खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरने ४, भुवनेश्वर कुमारने ३ तर नटराजनने १ विकेट घेतली.

त्याआधी, भारताने शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर ३२९ पर्यंत मजल मारली होती. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ७८ रन्सची इनिंग खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने ३ विकेट घेतल्या. त्याला इतर इंग्लिश बॉलर्सनीही चांगली साथ दिली.

    follow whatsapp