मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत कसोटी मालिकेत बाजी मारली आहे. ५४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात १६७ पर्यंत मजल मारु शकला. ३७२ धावांनी हा सामना जिंकत भारताने आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने कसोटी मालिका १-० च्या फरकाने जिंकली आहे. कानपूर कसोटी भारताला हातातोंडाशी आलेला विजय अंधुक प्रकाशामुळे गमवावा लागला होता.
ADVERTISEMENT
तिसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पाच विकेट गमावत १४० धावांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करु शकला नाही. त्यामुळे भारताने या सामन्यात पहिल्यापासूनच आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. रविचंद्रन आश्विन, जयंत यादव, अक्षर पटेल यांनी वानखेडे मैदानावरच्या खेळपट्टीचा सुरेख वापर करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं.
चौथ्या दिवशी विजयासाठी पाच विकेट हव्या असताना भारतीय गोलंदाजांनी सुरेख सुरुवात केली. जयंत यादवने रचिन रविंद्र, काएल जेमिन्सन आणि टीम साऊदी या तळातल्या फलंदाजांना झटपट माघारी धाडत न्यूझीलंडच्या उरल्या सुरल्या आव्हानातली हवाच काढून टाकली. रविचंद्रन आश्विनने हेन्री निकोल्सला वृद्धीमान साहाकरवी स्टम्पआऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT