दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ लगेचच विजयपथावर परत आला आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत भारताने ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अहमदाबाद येथील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी मात केली. सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा या सामन्यात चमकले.
ADVERTISEMENT
वेस्ट इंडिजने आपला कर्णधार कायरन पोलार्डला या सामन्यात विश्रांती देऊन निकोलस पूरनकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांना झटपट माघारी धाडण्यात विंडीजचे बॉलर यशस्वी झाले. कर्णधार रोहित शर्मा, सलामीला आलेला ऋषभ पंत आणि विराट कोहली माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था एका क्षणाला ३ बाद ४३ अशी झाली होती.
परंतू यानंतर सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी सर्वात आधी मैदानावर आपला जम बसवला. जम बसल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी धावा जमवण्याकडे लक्ष दिलं. ९१ धावांची भागीदारी झाल्यानंतर लोकेश राहुल दुसरी धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे रनआऊट झाला. त्याचं अर्धशतक एका धावेने हुकलं. यानंतर सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
६४ धावांची खेळी करुन सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर इतर फलंदाजांनी भारताला २३७ धावांचा टप्पा गाठून दिला. वेस्ट इंडिकडून अल्जारी जोसेप आणि ओडेन स्मिथ यांनी प्रत्येकी २-२ तर केमार रोच, जेसन होल्डर, अकिल हुसैन, फॅबिअन अॅलन यांनी १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात सावध सुरुवात केली. ब्रँडन किंग आणि शाई होप यांनी पहिल्या विकेटसाठी संघाला ३२ धावांची भागीदारी करुन दिली. अखेरीस प्रसिध कृष्णाने किंगला आऊट करत ही जोडी फोडली. यानंतर डॅरेन ब्राव्होही कृष्णाचा शिकार झाला. यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. ठराविक अंतराने विंडीजचे फलंदाज माघारी परतत राहिले.
Ind vs WI : मैदानात उतरण्याआधीच विराट कोहलीचं शतक, दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत मिळवलं स्थान
गरजेच्या वेळी महत्वपूर्ण भागीदारी रचण्यात विंडीजला अपयश आलं. शामराह ब्रुक्स, अकिल हुसैन, ओडेन स्मिथ यांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतू भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही. भारताकडून प्रसिध कृष्णाने ४, शार्दुल ठाकूरने २ तर मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि दिपक हुडाने १-१ विकेट घेतली.
ADVERTISEMENT