लखनऊ: लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी दणदणीत पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ 137 धावाच करू शकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ADVERTISEMENT
भारताचा हा सलग दहावा T20 विजय आहे. तसंच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील देखील टीम इंडियाचा हा सलग दहावा T20 विजय आहे. आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला त्याच्या आजच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
इशान-श्रेयसची तुफानी फलंदाजी
टीम इंडियासाठी सलामीवीर इशान किशनने 89 धावांची खेळी केली. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत 111 धावांची सलामी भागीदारी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेल्या संधीचा फायदा इशान किशनला करता आला नाही. अशा स्थितीत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र यावेळी त्याने आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध करुन दाखवली आहे.
दरम्यान, या सामन्यात श्रेयस अय्यरने देखील जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. श्रेयस अय्यरने फक्त 28 चेंडूतच 57 धावा केल्या. श्रेयसने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे भारताने 20 षटकात 199 धावांचा टप्पा पार केला. यावेळी भारताने फक्त दोन विकेट गमावल्या.
श्रीलंकेची टीम गडगडली
दुसरीकडे श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. भुवनेश्वरने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. श्रीलंकेने पहिल्या 7 षटकांत तीन विकेट गमावल्या, त्यानंतर काही भागीदारी झाल्या. मात्र भारताने दिलेल्या मोठ्या लक्ष्यासमोर श्रीलंकेचा संघ फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही.
श्रीलंकेसाठी चरिथ असालंकाने 53 धावा केल्या. पण ही खेळी केवळ 112 च्या स्ट्राइक रेटने तो खेळता. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. अखेरीस श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 137 धावा केल्या.
टीम इंडियाला लागोपाठ दुसरा झटका, दीपक चहर पाठोपाठ सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे संघाबाहेर
भारताचा सलग दहावा T20 विजय
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध लखनऊ टी-20 जिंकून सलग दहावा विजय नोंदवला. टी-20 विश्वचषकाच्या शेवटच्या टप्प्यापासून सुरू झालेली ही मालिका आतापर्यंत सुरू आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले, त्यानंतर रोहित शर्मा कर्णधार झाला आणि त्याच्या नेतृत्वातील सातही सामने भारताने जिंकले.
ADVERTISEMENT