कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने तीन सामन्याच्या टी20 मालिकेतही वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. खराब सुरूवात झाल्यानंतरही भारताने इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरच्या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजसमोर १८५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
ADVERTISEMENT
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या सामन्यात भारताने सलामीला ईशान किशनसोबत ऋतुराज गायकवाडला सलामीला पाठवलं. मात्र, ऋतुराजला मोठी खेळी करता आली नाही. संघाची धावसंख्या १० वर असतानाच जेसन होल्डरने ऋतुराजला (८ चेंडूत ४ धावा) तंबूत पाठवलं. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशांत किशनने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनी झटपट खेळी करत ९ षटकांतच भारताची धावसंख्या ६३ वर नेऊन ठेवली. मात्र, याचवेळी भारताला दुसरा झटका बसला.
हेडेन श्रेयस अय्यरला झेलबाद केलं. १६ चेंडूत २५ धावा करून श्रेयस अय्यर तंबूत परतला. सलामीला येणारा कर्णधार रोहित शर्मा आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. दरम्यान, १० षटकांत भारताला तिसरा धक्का बसला. ईशान किशन ३१ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर संघाच्या ९४ धावा असताना रोहित शर्माही बाद झाला.
इशांत तंबूत परतल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. व्यंकटेश अय्यरच्या सोबतीने सूर्यकुमारने अखेरच्या काही षटकांत चौफेर फटकेबाजी केली. व्यंकटेश आणि सूर्यकुमारने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसंच काढली. दोघांनी अखेरच्या सहा षटकात तब्बल ९० धावा कुटल्या. अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. भारतकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरची १९ चेंडूत ३५ धावांची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली.
१८५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात दीपक चहरने सलामीवीर मेयर्सला तंबूत धाडले. पंचांनी नाबाद दिल्यानंतर रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला आणि वेस्ट इंडिजला पहिला झटका बसला. त्यानंतर २६ धावा असताना वेस्ट इंडिजने दुसरा फलंदाज गमावला. दीपक चहरनेच होपला झेलबाद केलं.
त्यानंतर दीपक चहर गोलंदाजी करताना जायबंदी झाला. त्यामुळे शेवटचा चेंडू टाकत व्यंकटेश अय्यरने षटक पूर्ण केलं. त्यानंतर ७व्या षटकात हर्षल पटेलने भारताला तिसरं यश मिळवून दिलं. आक्रमक फलंदाजी करत असलेल्या रोवमन पॉवेलला हर्षलने झेलबाद केलं. त्यानंतर आलेल्या पोलार्डला मोठी खेळी करता आली नाही.
वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. पूरनने ४७ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६१ धावा केल्या. शेफर्डने २१ चेंडूत २९ धावा केल्या. अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला २३ धावांची गरज होती. मात्र, ९ गडी गमावत वेस्ट इंडिजला १६७ धावापर्यंत मजल मारता आली आणि भारताने १७ धावांनी सामना जिंकला.
ADVERTISEMENT