एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारताने टी20 मालिकेतही विजयी घौडदौड कायम ठेवली. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्माने तुफानी खेळी केली. तर सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरने विजय खेचून आणला.
ADVERTISEMENT
३ सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सात गडी बाद १५७ धावा केल्या. यात निकोलस पूरनने ४३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्याचबरोबर काइल मायर्सने ३१ धावा, तर पोलार्डने नाबाद राहत १९ चेंडूत २४ धावा केल्या.
पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारताच्या रवी बिश्नोईने जबरदस्त कामगिरी केली. बिश्नोईने ४ षटकात १७ धावा देत दोन बळी घेतले. विशेष म्हणजे रवी बिश्नोईने हे दोन्ही बळी एकाच षटकात टिपले. बिश्नोईबरोबरच हर्षलनेही वेस्ट इंडिजच्या दोन गड्यांना तंबूत पाठवलं. भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
वेस्ट इंडिजने दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरूवात दमदार झाली. कर्णधार रोहित शर्माने अवघ्या १९ चेंडूत झटपट ४० धावा केल्या. रोहितसोबत सलामीला आलेल्या ईशान किशन सुरूवातीला अडखळताना दिसला. मात्र, त्यानेही ४२ चेंडूत ३५ धावा केल्या.
सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर भारताने थोड्या फार अंतराने तीन गडी गमावले. भारताला पहिला झटका ६४ धावा असताना बसला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ९३ धावांवर ईशान किशन तंबूत परतला. त्यानंतर संघाची धावसंख्या ९५ असताना विराट कोहलीही बाद झाला.
त्यानंतर सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत ३४ धावा, तर व्यंकटेश अय्यरने १३ चेंडूत २४ धावांची नाबाद खेळी करत भारताचा विजय साकारला. दोघांनी २६ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT