टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहासाची नोदं करत कांस्यपदकाची कमाई केली आहे. अटीतटीच्या लढाईत भारताने जर्मनीवर ५-४ ने मात करत कांस्यपदक आपल्या नावे केलं. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली. १९८० साली भारतीय संघाने मॉस्कोत शेवटचं पदक मिळवलं होतं.
ADVERTISEMENT
या ऐतिहासीक विजयानंतर भारतीय संघावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दिग्गज भारतीय नेत्यांपासून ते क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका क्षणाला या सामन्यात भारत १-३ अशा पिछाडीवर होता. परंतू यानंतर भारतीय खेळाडूंनी सामन्याचं चित्रच पालटलं आणि सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. जर्मनीचा बचाव भेदून पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारतीय खेळाडूंना यश आलं. भारताच्या या आक्रमणासमोर जर्मनीची टीम दबावाखाली खेळताना दिसली. सामन्याच्या अखेरीस जर्मनीने पलटवार करण्याचा प्रयत्न केला, परंतू श्रीजेश आणि भारतीय बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
ADVERTISEMENT