भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला दुखापत झाल्याने तो आगामी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. जागतिक अजिंक्य स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याबाबतची अधिकृत माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने निवेदन जारी करुन दिली आहे. नुकतंच नीरज चोप्राने अप्रतिम कामगिरी करत जागतिक अजिंक्य स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्याने ८८.१३ मिटर भालाफेकून रौप्य पदकाची कमाई केली होती.
ADVERTISEMENT
जागतिक अजिंक्य स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो आगामी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळेल का नाही? याबाबत शंका होती. अखेर तो खेळणार नसल्याची माहिती सोमवारी आयओएने दिली. आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले नीरज चोप्रा याचा मला सकाळी अमेरिकेहून फोन आला होता. यावेळी त्याने आपणदुखापतीमुळे बर्मि्गहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळु शकणार नसल्याची माहिती दिली, असं मेहता यांनी सांगितलं.
रविवारी झालेल्या जागतिक अजिंक्य स्पर्धेतनंतर नीरज चोप्रा याचं एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्या स्कॅननुसार त्याला डॉक्टरांनी एक महिना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्यावर्षी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले होते. तेंव्हापासून देशाची नजर त्याच्यावर आहे. जागतिक स्पर्धेत देखील त्याने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, याच स्पर्धेतील अंतिम फेरीत चौथ्या अटेंप्ट दरम्यान मांडीत दुखापत जानवली होती.
त्यानंतर डॉक्टरांनी एमआरआय स्कॅननंतर नीरजला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात या स्पर्धेत नीरज चोप्रा खेळू शकणार नसल्याने भारतासाठी हा मोठा धक्का आहे. कारण नीरजसारखा उत्कृष्ट खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्याने भारतीयांची मोठी निराशा झाली आहे.
ADVERTISEMENT