इस्लामाबाद: पाकिस्तानचा (Pakistan) दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam ul Haq) याला हृदयविकाराचा झटका आल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. इंझमाम-उल-हक याला आज (सोमवार) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty)देखील करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंझमाम-उल-हकची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून आहे. इंझमामला गेल्या तीन दिवसांपासून सतत छातीत दुखत होते. त्यानंतर चाचणी करण्यात आली.
दरम्यान, करण्यात आलेल्या चाचणीत असे आढळून आले की, त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. यानंतर डॉक्टरांनी इंझमाम-उल-हकवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचं वृत्त समोर येताच अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी इंझमाम-उल-हकबद्दल ट्विट केले असून त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
51 वर्षीय इंझमाम-उल-हक यांची गणना पाकिस्तानच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये केली जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंझमामच्या नावावर आहे. इंझमाम-उल-हकने पाकिस्तानसाठी एकूण 375 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11701 धावा केल्या आहेत.
२०२१ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु होण्याचे संकेत
तर इंझमाम-उल-हकचा विक्रम कसोटी सामन्यांमध्येही उत्कृष्ट होता आणि त्याने 119 सामन्यांमध्ये जवळपास नऊ हजार धावा केल्या आहेत. इंझमाम-उल-हक बराच काळ पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार देखील होता. निवृत्तीनंतर त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले होते. 2007 साली इंझमामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
दरम्यान, भारताविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात इंझमाम-उल-हक कशी खेळी करतो याकडेच सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं असायचं.
न्यूझीलंडवर चिडला होता इंझमाम!
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडने ऐन वेळी पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळण्यास नकार दिल्याने संपूर्ण सीरीज रद्द करावी लागली होती. ज्यानंतर माजी कर्णधार इंझमामने प्रचंड संताप व्यक्त केला होता.
इंझमामने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले होते की, ‘न्यूझीलंडने पाकिस्तानसोबत जे केले आहे तसं ते दुसऱ्या कोणताही देशासोबत करु शकत नाही. ते आमचे पाहुणे होते आणि त्यांना काही समस्या होती तर त्यांनी पीसीबीशी बोलायला हवे होते. पाकिस्तान न्यूझीलंडला चांगली सुरक्षा पुरवत होता. 2009 मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर हल्ला झाल्यापासून आम्ही क्रिकेट संघांना एखाद्या राष्ट्रपतींना जेवढी सुरक्षा पुरवली जाते तशीच सुरक्षा दिली जाते.’
ADVERTISEMENT