आयपीएलच्या चौदाव्या सिझनला आजपासून चेन्नईत सुरुवात होते आहे. रोहित शर्माची गतविजेती मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. RCB ने या सिझनसाठी आपल्या संघात महत्वाचे बदल केले असून ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघात दाखल करुन घेतलंय. 14.25 कोटी रुपयांची बोली लावून RCB ने मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये घेतलं. पंजाबकडून खेळत असताना तेराव्या सिझनमध्ये मॅक्सवेलने खराब कामगिरी केली. ही कामगिरी इतकी खराब होती की आपल्या धडाकेबाज बॅटींगसाठी ओळखला जाणारा मॅक्सवेल गेल्या हंगामात एकही सिक्स मारु शकला नाही.
ADVERTISEMENT
IPL 2021 : RCB चा जीव भांड्यात, देवदत पडीकलची कोरोनावर मात
या खराब कामगिरीनंतरही मॅक्सवेलला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी CSK आणि RCB या दोन टीम्समध्ये चढाओढ लागली होती. अनेकांनी मॅक्सवेलला लावलेल्या बोलीवर आश्चर्य व्यक्त केलं. परंतू टी-२० क्रिकेटमध्ये एक सिझन खराब जाऊनही मॅक्सवेल सर्व संघांसाठी महत्वाचा का आहे हे आपण आज समजावून घेण्याचा प्रयत्न करुया.
अष्टपैलू कामगिरीच हाच मॅक्सवेलचा सर्वात मोठा USP –
ग्लेन मॅक्सवेल फॉर्मात असताना कशा पद्धतीने फटकेबाजी करु शकतो याचा सर्वांना अंदाज आहे. याव्यतिरीक्त त्याची कामचलाऊ ऑफ स्पिन बॉलिंग टीमसाठी फायदेशीर ठरु शकते, ज्याचा संघातील मुख्य बॉलर्सना फायदा होऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे मॅक्सवेल सरप्राईज पॅकेज म्हणून पॉवरप्लेमध्येही बॉलिंग करु शकतो. IPL 2020 मध्ये मॅक्सवेल हा पंजाबचा सर्वात महागडा खेळाडू होता, संघाने त्याच्यावर १०.७५ कोटी खर्च केले होते. परंतू त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही म्हणून पंजाबने त्याला संघातून रिलीज केलं.
परंतू यानंतरही मॅक्सवेल खचला नाही. आयपीएल नंतर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० सिरीजमध्ये मॅक्सवेलने १५० च्या स्ट्राईक रेटने रन्स करत स्वतःला सिद्ध केलं. याच कारणामुळे एक सिझन खराब केला असला तरीही कोणताही संघ मॅक्सवेलला दुर्लक्षित करु शकत नाही.
RCB आणि CSK दोघांनाही मॅक्सवेल आपल्या संघात का हवा होता?
बॅटिंग आणि ऑफ स्पिन बॉलिंग या दोन गुणांमुळे दोन्ही संघ मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये सहभागी करुन घेण्यासाठी उत्सुक होते. शेन वॉटसनच्या निवृत्तीनंतर CSK ला त्याच्या तोडीचा एक प्लेअर हवा होता. भारतीय खेळपट्टी आणि हवामान खेळण्याचा मॅक्सवेलला अनुभव आहे, ज्यामुळे त्याच्यासाठी CSK बोली लावत होती.
RCB ने देखील तेराव्या हंगामानंतर मोईन अलीला संघातून रिलीज केलं होतं. त्यामुळे त्याच्या जाण्यानंतर मधल्या फळीत बॅटींग करणारा आणि बॉलिंग करणारा एक प्लेअर RCB ला हवा होता. ज्यामुळे RCB देखील मॅक्सवेलवर बोली लावण्यासाठी मैदानात उतरली होती.
ऐनवेळी RCB ने कशी बाजी मारली, CSK मागे का पडलं?
हा सर्व फरक पडला तो म्हणजे पैशामुळे…IPL 2021 च्या ऑक्शनला RCB कडे ३५.४० कोटींची रक्कम शिल्लक होती. चेन्नई सुपरकिंग्जकडे १९.९० कोटी शिल्लक होते. मॅक्सवेलसाठी दोन्ही टीम्समध्ये युद्ध सुरु झालं आणि १० कोटींच्या बोलीचा आकडा पार झाला. परंतू १४ कोटींपर्यंत पोहचल्यानंतर आपल्याकडे उरणाऱ्या रकमेचा विचार केला असता CSK ला माघार घ्यावी लागली. यानंतर RCB ने १४.२५ कोटींची बोली लावत मॅक्सवेलला संघात घेतलं.
चेन्नई सुपरकिंग्जला मॅक्लवेलला खरेदी करता आलं नसलं तरीही हा त्यांच्यासाठी एका अर्थाने फायद्याचा सौदा ठरला. मॅक्सवेलवर लावलेल्या अर्ध्या बोलीच्या किमतीत चेन्नईने मोईन अलीला संघात स्थान दिलं. ग्लेन मॅक्सवेल म्हणा किंवा ख्रिस मॉरिस म्हणा, हे सर्व अष्टपैलू खेळाडू प्रत्येक संघाला हवे असतात. एखादा सामना किंवा सिझन खराब गेल्यानंतर त्यांच्यातली गुणवत्ता कमी होत नाही. मॅक्सवेलने तेराव्या हंगामात पुरती निराशा केली असली तरीही यंदा तो RCB चं नशिब उजळवू शकतो. याच कारणासाठी खराब कामगिरीनंतरही मॅक्सवेल यंदाच्या हंगामात करोडपती झाला.
या ६ स्टेडिअमवर रंगणार IPL 2021 चे सामने, जाणून घ्या प्रत्येक टीमचं Time Table
ADVERTISEMENT