IPL 2021 Final : विजयादशमीला CSK चा खेला होबे, KKR वर मात करत पटकावलं चौथं विजेतेपद

मुंबई तक

• 06:00 PM • 15 Oct 2021

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. अंतिम सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर २७ रन्सनी मात करत चौथं विजेतेपद पटकावलं आहे. १९३ रन्सचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ १६५ पर्यंत मजल मारु शकला. २०१२ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने अशाच परिस्थितीमध्ये चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता. परंतू त्या हंगामाची पुनरावृत्ती […]

Mumbaitak
follow google news

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. अंतिम सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर २७ रन्सनी मात करत चौथं विजेतेपद पटकावलं आहे. १९३ रन्सचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ १६५ पर्यंत मजल मारु शकला.

हे वाचलं का?

२०१२ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने अशाच परिस्थितीमध्ये चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता. परंतू त्या हंगामाची पुनरावृत्ती करण्यात कोलकात्याला यंदा अपयश आलं.

IPL 2021 Final : मराठमोळा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी, डु-प्लेसिसचीही आक्रमक इनिंग

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी संघात बदल केले नाहीत. कोलकात्याचा कॅप्टन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतू चेन्नईच्या फलंदाजांनी यंदा KKR चे सर्व मनसुबे उधळून लावले. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ऋतुराज गायकवाडने यादरम्यान ऑरेंज कॅप जिंकली. सुनील नारायणने गायकवाडला आऊट करत चेन्नईची जोडी फोडली.

IPL 2021 Final : कोणालाही न जमलेला विक्रम धोनीने आज करुन दाखवला

यानंतर फाफ डु-प्लेसिसने रॉबिन उथप्पाच्या सहाय्याने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. विशेषकरुन उथप्पाने चांगली फटकेबाजी करत चेन्नईची धावगती वाढवली. नाराणयने उथप्पाला आऊट करत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. यानंतर फाफ डु-प्लेसिसने संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. दुसऱ्या बाजूने मोईन अलीनेही त्याला उत्तम साथ देत ३७ रन्सची इनिंग खेळत उत्तम योगदान दिलं. इनिंगच्या अखेरच्या बॉलरवर डु-प्लेसिस ८६ रन्स काढून आऊट झाला.

प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने धडाकेबाज सुरुवात केली. व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी फटकेबाजी करत चेन्नईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. कोलकात्याची ही जोडी चेन्नईला महागात पडणार असं चित्र निर्माण झालं होतं. त्यातच सुरुवातीच्या ओव्हरमध्ये धोनीने अय्यरला एकही रन काढलेली नसताना कॅच सोडून जीवदान दिलं. त्यामुळे चेन्नई हा सामना गमावते की काय असं चित्र निर्माण झालं होतं.

मुंबईकर शार्दुल ठाकूरने व्यंकटेश अय्यरला आऊट करत KKR ची जोडी फोडली. अय्यरने ३२ बॉलमध्ये ५ फोर आणि ३ सिक्स लगावत ५० रन्स केल्या. परंतू यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. शार्दुल ठाकूर, रविंद्र जाडेजा यांनी मधल्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत कोलकात्याच्या डावाला खिंडार पाडलं. कोलकात्याचा एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे चेन्नईने अवघ्या काही क्षणांमध्ये सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. शिवम मवी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करुन सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. कोलकाताचा संघ सामन्यात यानंतर पुनरागमन करुच शकला नाही आणि चेन्नईने आयपीएलच्या इतिहासातलं आपलं चौथं विजेतेपद पटकावलं.

    follow whatsapp