-इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
साताऱ्यात रंगलेल्या ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून नवा महाराष्ट्र केसरी मिळाला. अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरला लोळवत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. अखेरच्या काही फेरीत पृथ्वीराजने चपळपणे खेळत करत प्रतिस्पर्धी पैलवानाचा पराभव केला. विशाल बनकर बनकर उप महाराष्ट्र केसरी ठरला.
सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने शाहू स्टेडिअमवर ६४व्या राज्य महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील असलेला मात्र पूर्व मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या विशाल बनकर यांच्यात जबरदस्त झुंज बघायला मिळाली.
किताब पटकावण्यासाठी पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या फेरीत विशाल बनकरने पृथ्वीराज पाटीलला लोळवत एकदम चार गुणांची कमाई केली. विशाल बनकरने आघाडी घेतल्यानंतर पृथ्वीराज पाटीलनंही आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. दरम्यान, स्टेपआऊटमुळे पृथ्वीराजला एक गुण मिळाला. त्यामुळे पहिल्या फेरीच्या अखेरीस विशाल बनकरने ४-१ अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरला कडवी झुंज दिली. विशाल बनकरविरुद्ध आक्रमक होत पृथ्वीराजने दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे विशाल बनकरची आघाडी १ कमी झाली. त्यानंतर अखेरच्या ४५ सेंकदाचा खेळ शिल्लक असताना पृथ्वीराजने आक्रमक केला. पृथ्वीराजचा डाव पलटवण्यात अपयशी ठरला आणि पृथ्वीराजने दोन गुणांची कमाई करत ५-४ ने आघाडी घेतली. त्यानंतर विशाल बनकरला आघाडी घेता आली नाही आणि पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
पृथ्वीराजने ५-४ ने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावताच कुस्तीप्रेमींनी त्याला खांद्यावर घेऊन जल्लोष केला. महाराष्ट्र केसरीचा निकाल लागताच अनेकांनी हलगीच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला.
शुक्रवारी वळवाच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर शनिवारी सकाळी उपांत्य फेरीतील लढती झाल्या. यामध्ये माती गटात विशाल बनकर याने महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांना चितपट करून मुख्य स्पर्धेसाठी दावेदारी केली होती.
पृथ्वीराज पाटील याने अक्षय शिंदे आणि हर्षल कोकाटे यांचा पराभव करत मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला होता. पृथ्वीराज पाटीलने पुणे शहराच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.
ADVERTISEMENT