मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला! वि.वि. करमरकर यांचे निधन

मुंबई तक

• 01:56 AM • 06 Mar 2023

v v karmarkar Death News : मुंबई । मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय क्रीडा समालोचक वि.वि. करमरकर यांचं सोमवारी (6 मार्च) सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. अंधेरी पूर्व […]

Mumbaitak
follow google news

v v karmarkar Death News : मुंबई । मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय क्रीडा समालोचक वि.वि. करमरकर यांचं सोमवारी (6 मार्च) सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Marathi Sports Senior journalist v.v karmarkar passes away)

हे वाचलं का?

1960 च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा.भ.कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि वाचकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यामुळे नंतर राज्यात इतर दैनिकांनी सुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे मटाचे क्रीडा पान त्यांनी इतके लोकप्रिय केले की पहिल्या पानावर एक नजर टाकली की वाचक थेट मागच्या खेळांच्या पानावर जात. आपली आवड पूर्ण झाली की मग आतल्या पानावर नजर टाकत. राज्यभरातल्या वाचकांच्या सर्व्हेमधून ही बाब ठळकपणे समोर आली होती.

नाना पटोलेंच्या भावावर काँग्रेस नेत्याच्या अपहरणाचा आरोप, काय आहे प्रकरण?

करमरकर यांच्या क्रीडा पानाच्या यशात त्यांच्या सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा होता. एक टीम उभी राहताना संघ नायक जितका महत्वाचा असतो, तितकेच त्यांचे सहकारी सुद्धा बिनीचे शिलेदार असतात. यामुळे टीमचे यश ठळकपणे समोर येते. करमरकर यांना आ.श्री. केतकर, वसंत भालेकर, चंद्रशेखर संत, सुहास फडके, प्रवीण टोकेकर, शरद कद्रेकर, संजय परब यांची तितकीच तोलामोलाची साथ मिळाली होती, हे विशेष!

करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत त्यांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली आणि ती सुद्धा क्रीडा पत्रकाराची. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा नसताना त्या आणून मराठी जगताला त्या वाचायला दिल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी आपली लेखणी सतत प्रभावी आणि प्रवाहितपणे चालवत ठेवली. यासाठी त्यांना द्वा.भ.कर्णिक यांच्याप्रमाणे गोविंद तळवलकर या ज्येष्ठ संपादकांचा भक्कम पाठिंबा मिळाला.

सामाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला. नकली आणि संवगतेच्या मागे न जाता जे पायाभूत असेल त्याची कास धरली पाहिजे, यावर त्यांचा कायम भर राहिला. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. मुख्य म्हणजे क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू यांनी याच वाटेवरून पुढे जायला हवे, जे कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले.

Crime: मीरा रोड परिसर हादरला! चप्पलेवरून भांडण… शेजाऱ्याने जीवच घेतला

क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खोखो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. खो खो संस्था, कार्यकर्ते यांना आधार दिला. परिणामी खेळ मोठा होत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या. बँका, रेल्वेची खोखो खेळाडूंना दारे उघडली गेली! दुसऱ्या बाजूला सिझन क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची असल्यास त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. परिणामी टेनिस क्रिकेटला महत्त्व देता कामा नये, यामुळे युवा खेळाडूंचा वेळ, मेहनत वाया जाते. यातून हाती काही लागत नाही. म्हणून त्यांनी कधीच टेनिस क्रिकेटचा फोटो सोडाच, सिंगल बातमी सुद्धा लावली नाही.

क्रीडा पत्रकार हा मैदानावर फिरता असला पाहिजे, याचा आदर्श त्यांनी स्वतः दिवसाचे अनेक तास खर्च करत इतरांसमोर ठेवला. यामुळे करमरकर यांच्या लेखणीला धार होती. प्रसंगी कौतुक करताना त्यांची लेखणी प्रचंड टोकदार होत असे. यातून मग कोणाची सुटका नसे! खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला.

करमरकर यांच्या प्रभावी लिखाणामुळे बुवा साळवी, श्रीपाद हळबे, रवी मांद्रेकर, बाळ वडवलीकर, रमेश वरळीकर, मंगेश भालेकर, भास्कर सावंत असे असंख्य संघटक आणि कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली. यामधून प्रेरणा घेत असंख्य कार्यकर्ते उभे राहिले. खेळांचा प्रचार प्रसार होत राहिला. परिणामी खेळांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर कायम राहिला.

पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील भ्रष्टाचाराची करमरकर यांनी पोलखोल केली. यामुळे त्यांच्यावर सुरेश कलमाडी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पण यामुळे न डगमगता करमरकर यांची लेखणी आणखी टोकदार केली. आकाशवाणी आणि दूरदर्शन यावर त्यानी अनेक विविध खेळाचं धावते समालोचन केले आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेदरम्यान दोन/तीन आठवडे त्यांचा कॉलम “ना खंत ना खेद” यात अत्यन्त अभ्यासपूर्ण वेगळी मौलिक माहिती वि.वि.क.आपल्या तजेलदार शैलीत मांडत असत. अत्यंत वाचनीय असं लिखाण मराठी क्रीडाक्षेत्रात अभूतपूर्व असेच होते.

चौकार,षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांनी कायम अट्टाहास धरला. परिणामी त्यांच्या बातम्या आणि लेख माहितीसह खूप परिणामकारक ठरले. आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळे श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.

    follow whatsapp