MCA च्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरूवारी पार पडणार आहे. पवार शेलार पॅनलचे अमोल काळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खुमासदार शैलीत भाषण केलं.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
आत्ताच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकताना अशी टाकली आहे ती टाकताना असं बांधलं आहे की सासरच्या माणसाला कोण टाळू शकतं? शरद पवार यांची जी क्वालिटी आहे त्यामुळेच क्रिकेटला ते इथपर्यंत नेऊ शकले असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पवार-शेलार पॅनलने चांगलं काम केलं आहे
जे पॅनल या ठिकाणी तयार झालं आहे त्यामागे शरद पवार आणि आशिष शेलार आहेत. या दोघांनीही मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी चांगलं काम केलं आहे. ज्यांना व्हिजन आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता आहे असे हे दोन्ही नेते आहेत. त्यांच्या पॅनलमधले नेते हे कर्तृत्ववान आहेत. त्यांच्याकडे सर्वांपर्यंत पोहचण्याची कला आहे. या पॅनलला मुख्यमंत्र्यांची आणि माझी दोघांची साथ आहे.
शेषराव वानखेडे हे मूळचे नागपूरचेच
आत्ताच शरद पवार यांनी आत्ताच सांगितलं की बॅ. शेषराव वानखेडे यांच्या नावे असलेली लिज संपली आहे. मी सांगू इच्छितो की शेषराव वानखेडे हे आमच्या नागपूरचे. महाराष्ट्राचे भूषण ते होतेच. नागपूरच्या माणसाने एक छोटासा वाद झाला तर एवढं मोठं स्टेडियम उभं करून दाखवलं. त्यामुळे मी आपल्या विनंती करतो की निश्चितपणे आज आपण यासंदर्भातली घोषणा करावी.
आपल्याकडे जी सुरक्षा पुरवली जाते त्यासंदर्भात जी १० कोटींची बाकी वगैरे राहिली आहे तर वसुलीला आम्ही आलो नाही. मी आपल्याला आणि एमसीएला आश्वस्त करतो की योग्य ती कारवाई करून हे बिल रद्द करण्याचं काम आम्ही करू. इतर राज्यांमध्ये जे काही नॉमिनल चार्जेस घेतले जातात तसं आम्ही टेम्प्लेट तयार करू आणि तसं धोरण राबवू. आम्ही सगळेच क्रिकेट प्रेमीच आहोत. आज आपण बघतोय की क्रिकेटचा विस्तार होतो आहे. MMR रिजनमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही योग्य ती सगळी मदत करू. मुख्यमंत्रीही आपल्यासोबत आहेतच असंही आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
MCA खूप चांगलं काम करतं आहे. ते आता आणखी पुढच्या चांगल्या पातळीवर न्यायचं आहे या अनुषंगाने काम करू. सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT