IPL 2022 : ‘आयपीएल’वर दहशतवाद्यांची नजर?; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई तक

• 10:39 AM • 24 Mar 2022

२६ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असतानाच आयपीएलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं एक पत्रक समोर आलं होतं. दहशतवाद्यांकडून खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्ससह मैदानांची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हे वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळून लावलं आहे. यंदा आयपीएल स्पर्धा राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच खेळवली जाणार आहे. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

२६ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असतानाच आयपीएलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं एक पत्रक समोर आलं होतं. दहशतवाद्यांकडून खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्ससह मैदानांची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हे वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळून लावलं आहे.

हे वाचलं का?

यंदा आयपीएल स्पर्धा राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी तयारी सुरू असून, दहशतवाद्यांनी हॉटेल ट्रायडंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडंट ते वानखेडे स्टेडियम या मार्गाची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खेळाडूंना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. ही माहिती मुंबई पोलिसांकडून फेटाळण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी काय म्हटलंय?

आयपीएल क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथील मैदानावर २६ मार्चपासून सुरू होत आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येत आहे.

अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून माहिती प्राप्त झालेली नाही. तरी आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियमवर हॉटेलवर आणि मार्गांवर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त मुंबई पोलिसांकडून पुरवण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस उप आयुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे.

गृहमंत्र्यांनीही वृत्त फेटाळलं

आयपीएल स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून, हॉटेल ट्रायडंट, वानखेडे स्टेडियम आणि हॉटेल ट्रायडंट ते वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याच्या वृत्ताबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी ही माहिती चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं.

माहिती सत्य नसल्याचं वळसे-पाटील म्हणाले. हॉटेल आणि स्टेडियमची कोणत्याही प्रकारची रेकी केली गेली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp