साताऱ्यात रंगलेल्या ६४ व्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने विजेतेपद पटकावत मानाची गदा मिळवली. मुंबईच्या विशाल बनकरवर पृथ्वीराजने मात केली. या विजेतेपदासह कोल्हापूर जिल्ह्याची २२ वर्षांपासूनची महाराष्ट्र केसरी विजेतेपदाची प्रतीक्षा अखेरीस संपुष्टात आली आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूरची शेकडो वर्षांपासूनची कुस्तीची परंपरा पुढे चालू ठेवणाऱ्या पृथ्वीराजला आता ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचा ध्यास लागला आहे. अंतिम फेरीचं विजेतेपद मिळवल्यानंतर उपस्थित कुस्तीसमर्थकांनी पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेत त्याची मिरवणूक काढली.
Maharashtra kesari 2022 : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला ‘महाराष्ट्र केसरी’
माझं विजेतेपद आणि मानाची गदा मी कोल्हापुरकरांना अर्पण करत आहे असं म्हणत पृथ्वीराजने सर्व कोल्हापूरवासियांची मनं जिंकली. अंतिम सामन्याला पृथ्वीराजच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती. आपल्या मुलाला मिळालेलं यश पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.
कोल्हापूरला २२ वर्षांपासून महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली नव्हती. माझ्या मुलाने हा २२ वर्षाचा दुष्काळ महाराष्ट्र केसरी विजेतेपद घेऊन दूर केला याचा मला अभिमान आहे. आई म्हणून मला खूप आनंद आहे, पृथ्वीराज जिद्द , चिकाटी व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली हा विजय कोल्हापूरकरांना अर्पण केला याचा मला सार्थ अभिमान मला आहे, असं म्हणत पृथ्वीराजच्या आईने माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली.
ADVERTISEMENT