क्रिकेट रसिकांना टी-२० विश्वचषकांच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक लढत बघायला मिळाली. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी कमाल केली. मात्र, बेन स्टोक्सच्या निर्णायक आणि तडाखेबंद खेळीनं १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं. सामना पाकिस्तानच्या बाजून झुकलेला असताना अफलातून खेळी करत बेन स्टोक्सने इंग्लंडचं विश्वविजेतेपद जिंकण्याचं स्वप्न साकार केलं.
ADVERTISEMENT
पाकिस्तानला नमवत अखेर इंग्लंड टी२० क्रिकेटचा विश्वविजेता बनला. मेलबर्नच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात १९९२च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र, इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं.
२०२२ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकत इंग्लंड दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केलीये. यापूर्वी इंग्लंडने २०१० मध्ये टी२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर एकाच वेळी एकदिवसीय आणि टी२० विश्वचषक स्वतःकडे ठेवण्याची कामगिरीही इंग्लंडने केलीये.
इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा करत पाकिस्तानला मोठं लक्ष्य गाठण्यापासून रोखल. करनने तीन गडी बाद केले. दुसरीकडे बेन स्टोक्सने पाच चौकार आणि एका षटकारासह महत्त्वपूर्ण अर्धशतकीय खेळी साकारली.
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर धावांचं मोठं आव्हान उभं करण्यात पाकिस्तानला यश आलं नाही. मात्र, कमी धावसंख्या असताना पाकिस्तानी गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजाचा घाम काढला. नसीम शाह, हॅरिस रऊफ यांनी पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडला धक्के दिले.
PAK vs ENG : पाकिस्तानची खराब सुरूवात
अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या पाकिस्तानची सुरूवात संथ झाली. पाचव्या षटकातच सॅम करणने रिझवानला बाद करत पाकिस्तानची सलामीची जोडी फोडली. त्यानंतर मोहम्मद हॅरिसही १२ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. कर्णधार बाबर आझमने धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिल रशीदने बाबर आझमला तंबूचा रस्ता दाखवला.
आतापर्यंत कुणी कुणी जिंकलाय टी२० विश्वचषक
भारत -२००७
पाकिस्तान-२००९
इंग्लंड – २०१०
वेस्ट इंडीज – २०१२
श्रीलंका – २०१४
वेस्ट इंडीज – २०१६
ऑस्ट्रेलिया – २०२१
इंग्लंड – २०२२
ADVERTISEMENT