टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने पुन्हा एकदा बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदासाठी अर्ज केला आहे. पीटीआयने यासंदर्भातली माहिती दिली आहे. राहुल द्रविडचा दोन वर्षांचा करार संपुष्टात आल्यानंतर संचालकपदाच्या जागेसाठी बीसीसीआयने नव्याने अर्ज मागवले होते.
ADVERTISEMENT
परंतू आतापर्यंत राहुल द्रविडचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराने या पदासाठी अर्ज केलेला नसल्यामुळे बीसीसीआयने अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. परंतू राहुल द्रविडने या जागेसाठी पहिल्यांदा अर्ज केल्यामुळे NCA मधलं त्याचं याआधीचं काम पाहता या जागेसाठी पुन्हा एकदा त्याचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयशी बोलताना दिली.
होय, राहुल द्रविडने NCA च्या संचालक पदासाठी पुन्हा एकदा अर्ज केला आहे. आतापर्यंत त्याने NCA मध्ये जे काही काम केलंय ते पाहता तोच या जागेसाठीची पहिली पसंती असेल हे जवळपास स्पष्ट आहे. राहुल द्रविडने NCA चा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने बदलून टाकला आहे. आतापर्यंत राहुलचा अपवाद सोडला तर एकाही लायक व्यक्तीचा अर्ज या पदासाठी आलेला नाहीये. ज्यावेळी राहुल द्रविडसारखा उमेदवार या पदाच्या शर्यतीत असतो त्यावेळी निकाल काय लागणार हे सर्वांनाच माहिती आहेत. परंतू आणखी कोणाला या जागेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आम्ही मुदतवाढ दिली आहे.
BCCI सूत्रांची पीटीआयला माहिती
टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टी-२० विश्वचषकानंतर पायउतार होण्याचं ठरवलं आहे. याबद्दल त्यांनी बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे राहुल द्रविड रवी शास्त्रींची जागा घेणार असे अंदाज गेल्या काही दिवसांपासून बांधले जात होते. परंतू NCA च्या संचालक पदासाठी द्रविडने पुन्हा एकदा अर्ज केल्यामुळे त्याचं नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडने श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मार्गदर्शन केलं होतं. यावेळी राहुलला टीम इंडियाचा कोच बनण्याबद्दल प्रश्न विचारला असता राहुल द्रविडने सध्या मी जे काम करतोय त्यात मी खुश असल्याचं सांगितलं होतं.
NCA संचालक म्हणून राहुल द्रविडचं काम करणं का महत्वाचं आहे?
याआधी राहुल द्रविडने अनेकदा भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केलंय. परंतु NCA ची जबाबदारी आल्यानंतर त्याने या संस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात मानहानीकारक पराभवानंतर पिछाडी भरुन काढत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी केलेले वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत या सर्वांची तयारी करुन घेण्यात राहुल द्रविड आणि त्याच्या टीमचा मोलाचा वाटा आहे. टीम इंडियाच्या राखीव फळीचं गेल्या काही दिवसांमध्ये चांगलंच कौतुक झालंय. ही राखीव फळी मजबुत करण्याचं श्रेय राहुल द्रविडला जातं.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची स्थापना ही भारताच्या तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी, भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंचा फिटनेस राखण्यासाठी मदत करणं, खेळाडूंना त्यांच्या तंत्रात सुधारणा करण्यासाठी मदत करण्याकरता झाली होती. राहुल द्रविडने संचालक म्हणून आपल्या काळात या संस्थेच्या कामात लक्ष घालून खेळाडूंना त्यांचं तंत्र सुधारण्यात मदत केली. भारताचे अनेक इंज्युअर्ड प्लेअर आधी NCA मध्ये जाऊन राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आपला फिटनेस आणि तंत्र सुधारुन घेत पुन्हा भारतीय संघात प्रवेश करतात. स्वतः राहुल द्रविड संचालक म्हणून या कामांमध्ये बारकाईने लक्ष घालत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत NCA च्या संचालकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा राहुल द्रविडच्या खांद्यावरच येण्याची चिन्ह दिसत आहे.
T-20 World Cup नंतर रवी शास्त्री आणि इतर सहकारी टीम इंडियाची जबाबदारी सोडण्याच्या तयारीत
ADVERTISEMENT