भारतीय क्रिकेट संघासाठी खेळाडूंच्या दुखापतीची समस्या अधिकच गडद होत चालली आहे. कारण टीम इंडियासाठी सर्वात मोठी समस्या स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचा फिटनेस बनली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आशिया चषक 2022 मधून बाहेर पडला आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार तो पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही खेळणार नाही. वृत्तसंस्था पीटीआयनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हवाल्याने म्हटले आहे की, जडेजावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर राहणार आहे.
ADVERTISEMENT
रोहित शर्मासाठी मोठा धक्का
रवींद्र जडेजा नुकताच टीम इंडियासोबत UAE मध्ये होता. आशिया कप 2022 मध्ये खेळत होता. जडेजा या स्पर्धेत पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळला होता. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाने 35 धावा करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता, तर दुसऱ्या सामन्यातही त्याने किफायतशीर गोलंदाजी करताना विकेट मिळवली होती. अशा स्थितीत स्टार अष्टपैलू खेळाडूची अनुपस्थिती रोहित शर्मासाठी मोठा धक्का असणार आहे.
BCCI नं व्यक्त केली गंभीर दुखापतीची शक्यता
बीसीसीआयच्या या अहवालात एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, जडेजाची दुखापत खूप गंभीर आहे आणि सध्या त्याच्या पुनरागमनासाठी वेळ निश्चित करता येणार नाही. “जडेजाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला झालेली दुखापत खूप गंभीर आहे. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून बाहेर राहणार आहे. या वेळी, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या वैद्यकीय संघाचं मूल्यांकन पाहिल्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या पुनरागमनासाठी कोणतीही मुदत दिली जाऊ शकत नाही.
ADVERTISEMENT