वन-डे सामन्यांची सुरवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का??

मुंबई तक

• 06:19 AM • 26 Jan 2021

क्रिकेट हा Gentleman’s Game म्हणून ओळखला जातो. ९० च्या दशकानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये आणि आयोजनात बरेच बदल झाले. सध्या क्रिकेट म्हणजे पैसा, ग्लॅमर, थरार आणि मनोरंजन असं समीकरण तयार झालं आहे. वन-डे, कसोटी आणि टी-२० अशा तीन प्रकारात क्रिकेटचे सामने खेळवले जातात. सुरुवातीचा काळ हा खूप वेगळा होता. सध्या कसोटी क्रिकेटला चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद कमी होत […]

Mumbaitak
follow google news

क्रिकेट हा Gentleman’s Game म्हणून ओळखला जातो. ९० च्या दशकानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये आणि आयोजनात बरेच बदल झाले. सध्या क्रिकेट म्हणजे पैसा, ग्लॅमर, थरार आणि मनोरंजन असं समीकरण तयार झालं आहे. वन-डे, कसोटी आणि टी-२० अशा तीन प्रकारात क्रिकेटचे सामने खेळवले जातात. सुरुवातीचा काळ हा खूप वेगळा होता. सध्या कसोटी क्रिकेटला चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद कमी होत असला तरीही जुन्या काळात कसोटी क्रिकेट हा एकमेव प्रकार अस्तित्वात होता. मात्र इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील Ashes मालिकेदरम्यान एका सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि इथूनच वन-डे क्रिकेटने जन्म घेतला.

हे वाचलं का?

१९७० साली नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात Ashes मालिका खेळवली जात होती. या मालिकेत ६ सामने खेळवले जाणार होते. ब्रिस्बेन आणि पर्थमध्ये खेळवण्यात आलेला अनुक्रमे पहिला व दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. २९ डिसेंबर १९७० ला मेलबर्नच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू पहिले ३ दिवस पावसामुळे वाया गेले आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला हा सामना रद्द करावा लागला. त्या काळात क्रिकेट सामन्याचं आयोजन करताना विम्याची संकल्पना नव्हती. तिसरा कसोटी सामना रद्द झाल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं नुकसान भरुन काढण्यासाठी दोन्ही बोर्डांनी आणखी एक कसोटी सामना खेळण्याचा निर्णय घेतला.

परंतू यावेळी इंग्लंडचे खेळाडू सातवा कसोटी सामना खेळण्यासाठी अतिरीक्त मानधनावर अडून बसले. त्या काळात क्रिकेटपटूंना स्पॉन्सर्स नसायचे. प्रत्येक खेळाडूला सामन्यानुसार ठराविक मानधन मिळायचं. त्यामुळे मेलबर्नच्या लोकांसाठी दोन्ही बोर्डांनी ४०-४० ओव्हर्सचा वन-डे सामना खेळवण्याचं ठरवलं. (८ बॉलची एक ओव्हर) मात्र या सामन्याच्या आयोजनासाठी पुन्हा एकदा स्पॉन्सर शोधण्याचं मोठं काम क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर उभं ठाकलं. मोठ्या प्रयत्नांनंतर तंबाखुजन्य पदार्थ बनवणारी रॉथमेंस या कंपनीने वन-डे सामन्याला ५ हजार पाऊंडची स्पॉन्सरशीप दिली. या सामन्यासाठी कंपनीने २० हजार तिकीटं विकण्याचं ध्येय ठेवलं होतं. तर सामनावीराचा पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला ९० पाऊंडांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्नमध्ये हा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बिल लॉरीने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघाने ३९.४ ओव्हसमध्ये १९० रन्स केल्या. इंग्लंडकडून मिडल ऑर्डरमध्ये खेळणारा बॅट्समन जॉन एंड्रीचने सर्वाधिक ८२ रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे लक्ष्य सहज पूर्ण करत सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडच्या जॉन एंड्रीचला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान पहिल्या वन-डे सामन्यासाठी स्पॉन्सरशीप देणाऱ्या रॉथमेंस कंपनीलाही चांगलाच फायदा झाला. २० हजार जणं मॅच पाहण्यासाठी येतील असं वाटत असताना प्रत्यक्षात ४६ हजार प्रेक्षकांनी या सामन्याला हजेरी लावली. या सामन्याला मिळालेली प्रसिद्धी पाहता आयसीसीने त्याला वन-डे सामन्याचा अधिकॉत दर्जा दिला आणि जगात वन-डे क्रिकेटची सुरुवात झाली.

    follow whatsapp