नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी आपल्या काळात समर्थपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. पण १९७१ च्या दरम्यान त्यांना डोळ्याने कमी दिसायला लागल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व मुंबईच्या अजित वाडेकरांकडे आलं. त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाचं वर्चस्व होतं. इंग्लंडचा संघ हा त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला दुसऱ्या क्रमांकाचा दादा संघ मानला जायचा. मालिकेला सुरुवात झाली आणि पहिले दोन सामने अतिशय रंगतदार झाले.
ADVERTISEMENT
भारतीय संघाने हे दोन्ही सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. तिसरी टेस्ट मॅच ओव्हलच्या मैदानावर खेळवली जाणार होती. १९ ऑगस्ट रोजी या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्यांदा बॅटींग करताना इंग्लंडच्या टीमने ३५५ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून दिलीप सरदेसाई, फारुख इंजिनीअर यांनीही हाफ सेंच्यूरी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हाही भारतीय संघाची पहिली इनिंग सुरुच होती. सामन्याचा एकंदर रागरंग पाहता पहिल्या दोन टेस्ट मॅचप्रमाणे हा सामनाही ड्रॉ होईल असं वाटत होतं.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी सर्व खेळाडू वॉर्म-अप करत होते. तेवढ्यातच ओव्हल मैदानाशेजारील एका रशियन सर्कसमधली बेला नावाची हत्तीण मैदानात शिरली आणि तिने मैदानावर चक्कर मारायला सुरुवात केली. सुरुवातीला कर्णधार वाडेकर यांचं या हत्तीणीकडे लक्ष नव्हतं. परंतू भारतीय संघाच्या टीम मॅनेजरने वाडेकरांपाशी जात त्यांना सांगितलं, “अजित ही चांगली संधी आहे. आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि आजच गणेशजी इकडे आलेत. आपल्याला हत्तीचं दर्शन झालंय. या आशिर्वादाच्या जोरावर आपण मॅच जिंकू शकतो.” वाडेकर यांना यातून प्रेरणा मिळाली की नाही हे माहिती नाही पण भारतीय संघाने या सामन्यात दमदार पुनरागमन केलं.
पहिल्या डावात भारताचा संघ २८४ रन्सवर ऑलआऊट झाला आणि इंग्लंडला ७१ रन्सचा लिड मिळाला. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचे फिरकीपटू चंद्रशेखर यांनी आपल्या जाळ्यात इंग्लंडच्या बॅट्समनला अडकवलं. चंद्रशेखर यांनी या डावात एक नव्हे तर तब्बल ६ विकेट्स घेतल्या. या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव १०१ धावांत आटोपला. ज्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी फक्त १७३ धावांचं आव्हान मिळालं होतं. याच दिवशी दिलीप सरदेसाई आणि अजित वाडेकर यांनी चांगली सुरुवात करत भारताला विजयपथावर आणून ठेवलं. ४५ रन्सवर अजित वाडेकर रन-आऊट झाले. यानंतर वाडेकर ड्रेसिंग रुममध्ये येऊन थेट झोपून गेले. भारतीय संघाला विजयासाठी अजूनही ९७ धावांची गरज होती. गुंडप्पा विश्वनाथ आणि फारुख इंजिनीअर यांनी या धावा करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारतीय संघाच्या या विजयानंतर इंग्लंडच्या संघाचे मॅनेजर केन बॅरिंग्टन इतके खुश झाले होते की त्यांनी थेट भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जात अजित वाडेकर यांना झोपेतून उठवत ही आनंदाची बातमी दिली होती.
ADVERTISEMENT