न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला हातातोंडाशी आलेला विजय गमवावा लागला आहे. अखेरच्या १० ओव्हर्समध्ये विजयासाठी १ विकेट हवी असताना रचिन रविंद्र आणि एजाज पटेल या न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने सर्व ओव्हर्स खेळून काढत भारताचा विजय हिसकावून घेतला. कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर अनेक माजी खेळाडू आणि सोशल मीडियावर फॅन्सनीही, दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने आपला डाव घोषित करण्यासाठी वेळ घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
परंतू भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने विजय हातातून निसटल्यामागे डाव घोषित करण्यासाठी झालेल्या उशीर याऐवजी खेळपट्टीला दोष देत नाराजी व्यक्त केली आहे.
“माझ्या मते कानपूरची खेळपट्टी खूपच सपाट आणि स्लो होती. त्या पिचवर बॉल फारसा टर्न होत नव्हता किंवा बाऊन्सही होत नव्हता. भारतीय वातावरणात खेळत असताना पाच दिवसांच्या खेळात खेळपट्टीवर बॉल टर्न होईल अशी तुमची अपेक्षा असते. परंतू या खेळपट्टीवर मला तसं काहीही दिसलं नाही”. द्रविड सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता.
Ind vs NZ : अंधूक प्रकाशाने हिसकावला टीम इंडियाच्या हातातला विजयाचा घास
सर्वसाधारणपणे भारतात खेळत असताना अखेरच्या दिवशी स्पिनर्सचे बॉल हे बॅट्समनची इनसाईड एज घेऊन फिल्डरपर्यंत जातात, किंवा अनेकदा LBW विकेट मिळण्याची शक्यता असते. परंतू या सामन्यात मला कुठेही एजेस दिसल्याच नाहीत. अखेरच्या दिवसापर्यंत बॉल व्यवस्थित बॅटवर येत होता, त्यामुळे कड घेऊन कॅचसाठी फिल्डरपर्यंत जाताना दिसलाच नाही. स्पिनर्सच्या बॉलिंगवर जवळ उभा राहून कोणीही कॅच घेतले नाहीत, भारतने विकेटकिपींग करताना काही सुंदर कॅच घेतले, पण त्याव्यतिरीक्त काहीही झालं नाही, असंही द्रविड म्हणाला.
त्यामुळे अखेरच्या दिवशी विकेट घ्यायची असेल तर फक्त दोनच पर्याय दिसत होते. एक म्हणजे बोल्ड किंवा LBW. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता आम्ही चांगला खेळ केला असं मला वाटतं. शेवटच्या दिवसात ९ विकेट घेणं कठीण काम असतं. कानपूरच्या खेळपट्टीवर असं काहीसं होईल अशी तुम्ही अपेक्षा करुच शकता. मी इथे याआधी खेळलोय, खेळपट्टी कठीण असू शकते याचा मला अंदाज आहे. परंतू माझ्या अनुभवातली ही सर्वात सपाट आणि स्लो खेळपट्टी होती, असं म्हणत द्रविडने आपलं मत मांडलं आहे.
Ind vs NZ : आम्ही दबावाखाली होतो, कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर द्रविडचं मोठं विधान
ADVERTISEMENT