आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विश्वात मानाची समजली जाणाऱ्या थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाकेबाज खेळ करत भारतीय संघाने आपलं पहिलं-वहिलं विजेतेपद मिळवलं आहे. अंतिम फेरीत भारताने इंडोनेशियाचा ३-० ने धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. उपांत्य फेरीत भारताने डेन्मार्कवर अटीतटीच्या लढतीत ३-२ ने मात करत आपलं पदक निश्चीत केलं होतं.
ADVERTISEMENT
युवा खेळाडू लक्ष्य सेन, दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रणकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि किदम्बी श्रीकांत यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंची कडवी झुंज मोडून काढत भारताला पहिलं-वहिलं थॉमस कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. इंडोनेशियाचा संघ या स्पर्धेतला तुल्यबळ संघ म्हणून ओळखळा जातो. आतापर्यंत इंडोनेशियाने १४ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. परंतू भारतीय संघाने अंतिम फेरीत एकही सामना न गमावता, कडवी झुंज मोडून काढत पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
भारताकडून सुरुवातीच्या सामन्यासाठी युवा खेळाडू लक्ष्य सेन कोर्टमध्ये उतरला. लक्ष्य सेनसमोर इंडोनेशियाच्या अँथनी गिनटींगचं आव्हान होतं. पहिल्या सेटमध्ये गिनटींगने लक्ष्य सेनवर संपूर्ण वर्चस्व गाजवत २१-८ च्या फरकाने सेट जिंकला. परंतू युवा लक्ष्य सेनने हार न मानता लगेचच दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरालाच लक्ष्य सेनने ११-७ अशी आघाडी घेतली होती. गिनटींगने सेनला झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा परंतू लक्ष्यने संपूर्ण जोर लावत २१-१७ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णयाक सेटमध्ये गिनटींगने पुन्हा एकदा धडाकेबाज सुरुवात करत सुरुवातीच्या क्षणांमध्ये आघाडी घेतली. २-५ अशा पिछाडीवर पडलेल्या लक्ष्य सेनला मध्यांतरापर्यंत पुनरागमन करता आलं नाही. गिनटींगने तिसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-७ अशी आघाडी घेतली होती. परंतू मध्यांतरानंतर लक्ष्य सेननेही आपली पिछाडी भरुन काढत २१-१८ च्या फरकाने सामना जिंकत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुहेरी फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकीरेड्डी यांनी आश्वासक सुरुवात केली. परंतू आश्वासक सुरुवातीनंतरही दोघांना पहिला सेट १८-२१ ने गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्येही भारतीय जोडी एका क्षणाला पिछाडीवर होती. परंतू अखेरपर्यंत हार न मानता भारतीय जोडीने दुसरा सेट २३-२१ ने जिंकत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर भारतीय जोडीने तिसऱ्या सेटमध्येही आपला धडाका सुरु ठेवत २१-१९ च्या फरकाने बाजी मारत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतसमोर इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीचं आव्हान होतं. परंतू किदम्बी श्रीकांतने पहिला सेट जिंकून चांगली सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये जोनाथनने किदम्बी श्रीकांतला चांगलंच झुंजवलं. एका क्षणाला श्रीकांत दुसरा सेट गमावणार असं वाटत असताना, मोक्याच्या क्षणी जोनाथनने केलेल्या काही चुका श्रीकांतला पथ्यावर पडल्या. ज्याचा फायदा घेत श्रीकांतने दुसऱ्या सेटमध्येही बाजी मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंतर सर्व भारतीय खेळाडूंनी कोर्टमध्ये येत जल्लोष केला.
ADVERTISEMENT