आपली पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या भारताच्या लोवलिना बोर्गोहेनला अखेरीस कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. बॉक्सिंगच्या ६४-६९ किलो वजनीगटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीने लोवलिनाचा ५-० ने धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. चीन तैपेईच्या खेळाडूवर मात करत लोवलिनाने उपांत्य फेरीत धडक मारली होती. ज्यानंतर तिचं कांस्यपदक निश्चीत झालं होतं. परंतू सुवर्णपदाच्या शर्यतीसाठी उतरलेल्या सामन्यात तिचा निभाव लागला नाही.
ADVERTISEMENT
बुर्सेनाझ सुरमेनेलीने पहिल्याच राऊंडमध्ये लोवलिनाला आपल्या आक्रमक खेळाचा परिचय दिला. प्रत्युत्तरादाखल लोवलिनानेही काही सुरेख पंच लगावत सुरमेनेलीला आव्हान दिलं. परंतू पहिल्या राऊंडमध्ये सुरमेनेलीच्या गतीपुढे लोवलिनाची गती कमी पडलेली पहायला मिळाली. आपल्या अनुभवाचा फायदा घेत सुरमेनेलीने लोवलिनाला काही चुका करायला भाग पाडत त्याचा फायदा घेतला. पहिल्या राऊंड अखेरीस सुरेमेनेलीच्या पारड्यात सर्व पंचांनी एकमताने आपलं मत टाकलं.
दुसऱ्या राऊंडमध्येही सुरमेनेलीचं पारड जड पहायला मिळालं. लोवलिनाचा बचाव भेदत सुरमेनेलिने अपर कट आणि पंच लगावत चांगले गुण कमावले. सुरमेनेलीच्या आक्रमणासमोर लोवलिनाचा जराही निभाव लागताना दिसला नाही. त्यातच राऊंडदरम्यान रेफ्रीनी खेळ थांबवण्याचा निर्णय दिल्यानंतरही लोवलिनाने एक पंच सुरमेनेलीला लगावल्यामुळे भारताला दंडात्मक गुण देण्यात आला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या राऊंडअखेरीसही सर्व पंचांनी एकमताने सुरमेनेलिच्या पारड्यात आपलं मत टाकलं.
यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये पुनरागमन करणं लोवलिनाला शक्यच झालं नाही. लोवलिनाला थकवत सुरमेनेलिने संपूर्ण सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. तिसऱ्या सत्राअखेरीसही सर्व पंचांनी एकमताने सुरमेनेलिच्या पारड्यात आपलं मत टाकत तिला विजेता घोषित केलं.
Tokyo Olympic 2020 : ‘तो’ प्रकार म्हणजे माझा मानसिक छळ, बॉक्सर Mary Kom आयोजकांवर नाराज
याआधी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात लोवलिनाने जर्मनीच्या खेळाडूला पराभूत केलं. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत लोवलिना बोर्गोहेनने चीन तैपेईच्या चेन निएनचा ४-१ ने पराभव केला होता. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लोवलिनाने धडाकेबाज खेळ केला. पहिल्या राऊंडमध्ये पाचपैकी ३ पंचांनी लोवलिनाच्या बाजूने निकाल दिला होता. दुसऱ्या सेटमध्ये चीन तैपेईच्या खेळाडूने आक्रमक पंच लगावत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
परंतू लोवलिनाने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत सुंदर बचाव आणि आक्रमण करत चीन तैपेईच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या राऊंडचा निकाल सर्वानुमते लोवलिनाच्या बाजूने लागल्यानंतर सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. सामन्यात उलटफेर करण्यासाठी चीन तैपेईच्या खेळाडूला मोठा उलटफेर करण्याची गरज होती. परंतू प्रत्यक्ष सामन्यात लोवलिनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला संधीच दिली नाही.
ADVERTISEMENT