टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या ११व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन घडवलं. बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगत चमकदार कामगिरी करत भारतासाठी पदक निश्चित केलं. तर नेमबाजी स्पर्धेत मनीष नरवाल आणि सिंहराज अधानाने अंतिम फेरीत धडक मारली.
ADVERTISEMENT
टोकियो पॅरालिम्पिकच्या ११व्या दिवसाची सुरूवात भारतीय खेळाडूंनी पदक निश्चितीने केली. बॅटमिंटन पुरूष एकेरीच्या एसएल थ्री मध्ये भारताचा बॅटमिंटनपटू प्रमोद भगत याने उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
प्रमोद भगतने जपानचा बॅटमिंटनपटू फुजिहारा डायसुके यांचा २१-११, २१-१६ अशा फरकाने पराभव करत पदक निश्चित केलं. प्रमोद भगतने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्याने या विजयाबरोबरच भारतासाठी रौप्य पदकही निश्चित केलं आहे. प्रमोद भगतच्या पदकांसह भारत्याच्या खात्यात १४ पदकं जमा झाली आहेत.
नेमबाजीतही वरचष्मा…
एसएच-१ श्रेणीतील नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना या दोन्ही खेळाडूंनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. क्वॉलिफिकेशन फेरीत ५३६ गुणांसह अधानाने चौथ्या क्रमांक पटकावला. तर मनीष नरवाल ५३३ अंकांसह सातव्या क्रमांकवर राहिला. अधाना १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकेललं आहे.
मनोज सरकार कांस्य पदकासाठी खेळणार
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरूष एकेरी बॅटमिंटन स्पर्धेतील एसएल थ्रीमध्ये भारताचा बॅटमिंटनपटू मनोज सरकारला पराभवाचा सामना करावा लागला. मनोज सरकारला बेथेल डॅनियलकडून पराभव स्वीकारावा लागला. २१-८, २१-१० अशा फरकाने मनोजचा पराभव झाला. मात्र, मनोजच्या पदकाच्या आशा अजूनही कायम आहेत. मनोज सरकार आता कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहे. मनोज सरकार कांस्य पदकासाठी जपानच्या फुजिहारा डायसुकेविशी लढत देणार आहे.
प्रमोद भगतचा मुकाबला डॅनियलशी
बॅटमिंटनपटू प्रमोद भगतचा अंतिम फेरीत बेथेल डॅनियलशी मुकाबला होणार आहे. डॅनियलने भारताच्या मनोज सरकारचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे प्रमोद भगत आणि डॅनियल यांच्यातील अंतिम सामन्याकडे चाहत्यांची नजर असणार आहे.
ADVERTISEMENT