युवा कर्णधार यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बांगलादेशवर ५ विकेटने मात करत भारतीय संघाने हा करिष्मा साधला आहे. या विजयासह भारतीय संघाने मागिल विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत स्विकाराव्या लागलेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली आहे. मराठमोळ्या कौशल तांबेने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून भारतीय संघाने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. गोलंदाजीत भारतासाठी हिरो ठरला रवी कुमार. रवीने सामन्यात ३ विकेट घेत बांगलादेशच्या डावाला सुरुवातीच्या षटकापासून खिंडार पाडलं. मफिजुल इस्लामला क्लिन बोल्ड करत रवी कुमारने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर बांगलादेशच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे भारताचं काम सोपं झालं.
एका क्षणाला बांगलादेशचा संघ ७ बाद ५६ अशा बिकट अवस्थेत सापडला होता. बांगलादेश शंभरी ओलांडतो की नाही असं वाटत असतानाच अखेरच्या फळीत मेहरुब आणि अशिकुर झमान यांनी केलेल्या छोटेखानी भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने १०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला.
अंगरिक्ष रघुवंशीने मेहरुबला आऊट करत बांगलादेशची जोडी फोडली. यानंतर तळातल्या इतर फलंदाजांना फारशी संधी न देता भारताने बांगलादेशचा डाव १११ धावांवर संपवला. भारताकडून रवी कुमार ३, विकी ओत्सवालने २ तर राजवर्धन हांगर्गेकर, कौशल तांबे आणि रघुवंशी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बांगलादेशचे दोन फलंदाज रन आऊट झाले.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. हसन साकीबच्या गोलंदाजीवर कट करण्याच्या प्रयत्नात हर्नुर सिंग भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर अंगरिक्ष रघुवंशी आणि शेख रशिदने भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी रचलेल्या भागीदारीमुळे १११ धावा डिफेंड करणारा बांगलादेशचा संघ सामन्यात बॅकफूटला ढकलला गेला. अखेर ही जोडी फोडण्यात बांगलादेशचे गोलंदाज यशस्वी झाले. परंतू यानंतर कर्णधार यश धुल आणि कौशल तांबे यांनी उर्वरित धावा पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT