यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवा संघाचा विजयरथ यशस्वी कामगिरी करुन भारतात परतणार आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १९० धावांचं आव्हान भारताने आश्वासक खेळ करुन पूर्ण केलं. U-19 वर्ल्डकपच्या इतिहासातलं भारताचं हे विक्रमी पाचवं विजेतेपद ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाहीये.
ADVERTISEMENT
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी, आयर्लंडवर १७४ धावांनी, युगांडावर ३२६ धावांनी, बांगलादेशवर ५ धावांनी आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवला होता. हीच विजयी परंपरा भारताच्या युवा खेळाडूंनी अंतिम सामन्यातही कायम राखली.
गोलंदाजीत आश्वासक कामगिरी केल्यानंतर भारतीय डावाची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर रघुवंशी भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर हर्नुर सिंग आणि उप-कर्णधार शेख रशिद यांनी आश्वासक भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. हर्नुर सिंगला आऊट करत इंग्लंडने भारताला दुसरा धक्का दिला. यानंतर शेख रशिदने कर्णधार यश धुलच्या साथीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. यादरम्यान शेख रशिदने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
ही जोडी मैदानावर तग धरुन भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच सेल्सने शेख रशिदला आऊट केलं. ठराविक अंतराने कर्णधार यश धुलही सेल्सच्या बॉलिंगवर माघारी परतला. यानंतर मधल्या फळीत निशांत सिंधू आणि गोलंदाजीत ५ विकेट घेणाऱ्या राज बावाने महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. दोघांनीही काही चांगले फटके खेळत इंग्लंडच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. राज बावा बॉयडनच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर सामन्यात रंगत निर्माण झाली होती.
सामना जिंकायला १४ धावांची गरज असताना कौशल तांबे अस्पिनवॉलच्या गोलंदाजीवर एक धाव काढून माघारी परतला. त्यामुळे अखेरच्या क्षणांमध्ये इंग्लंड सामन्यात पुनरागमन करणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू निशांत सिंधूने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. निशांत सिंधूने यावेळी आपलं अर्धशतकही पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचं आणि महत्वाचं योगदान दिलं. दिनेश बानाने भारताकडून विजयी शॉट खेळला.
त्याआधी भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडाकेबाज सुरुवात केली. राज बाजवा आणि रवी कुमार यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला १८९ धावांत गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलं. राज बावाने ५ तर रवी कुमारने ४ विकेट घेतल्या. मराठमोळ्या कौशल तांबेने १ विकेट घेतली.
टॉस जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. जेकब बेथलला आऊट करत रवी कुमारने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर इंग्लंडच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. राज बावा आणि रवी कुमार यांनी इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला.
७ बाद ९१ अशा खडतर अवस्थेत सापडलेल्या इंग्लंडला आधार दिला तो जेम्स रिऊने. रिऊने जेम्स सेल्सच्या सोबतीने ९३ धावांची भागीदारी केली. या जोडीने भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. रिऊने ११६ बॉलमध्ये १२ चौकार लगावत ९५ धावांची खेळी केली. रवी कुमारने रिऊला कौशल तांबेकरवी आऊट केलं. यानंतर इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी झटपट गुंडाळलं.
ADVERTISEMENT