19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने धमाकेदार सुरुवात केली. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभूत करत विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 232 धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिका 187 धावांपर्यंत मजल मारू शकली.
ADVERTISEMENT
नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात चांगली झाली नाही. 11 धावा झालेल्या असतानाच भारताला दोन मोठे धक्के बसले. सलामीवर अंगक्रिश रघुवंशी 5 धावा करून, तर हरनूर (01) खातं उघडून बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या एफिवे मनयांदाने चौथ्या षटकात हरनूरला, तर सहाव्या षटकात रघुवंशीला पायचीत केलं. सलग दोन धक्के बसल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार यश धुल आणि एस. राशीद यांनी डावाला आकार दिला. धुल आणि एस. राशीदने तिसऱ्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली.
लियाम एल्डरने राशीदला पायचीत करत भारताला तिसरा झटका दिला. त्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या निशांत सिंधुने 25 चेंडूत 5 चौकारांसह 27 धावा केल्या. कॉपलँडने त्याला त्रिफळाचित केलं. यश धुल बाद झाला त्यावेळी भारताने 195 धावांपर्यंत मजल मारली होती. 46.5 षटकात भारताने सर्वबाद 232 धावा केल्या.
भारताने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचीही घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलअर्स समजल्या जाणाऱ्या डेवॉल्ड ब्रेविस वगळता एकाही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. ब्रेविसने 65 धावा केल्या.
भारताच्या ओस्तवालच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. ओस्तवालने किटिमे (25), मारी (08), कोपलँड (01), सोलोमॉन्स (00) आणि बोस्ट यांना तंबूत परत पाठवलं. ओस्तवालने आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरूगंच लावला. त्यामुळे तीन 138 धावा अशा स्थिती असलेल्या आफ्रिकेला 45.4 षटकात 187 धावापर्यंतच मजल मारता आली.
ADVERTISEMENT