सध्या संपूर्ण जगाच्या नजरा या अफगाणिस्तानकडे लागल्या आहेत. तालिबानी अतिरेक्यांनी राजधानी काबुलवर मिळवलेला ताबा, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून केलेलं पलायन यामुळे अफगाणिस्तानात सध्या हाहाकार सुरु आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीत रहायचं नसल्यामुळे लोकं मिळेल त्या मार्गाने देश सोडून जायच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानच्या या सत्तासंघर्षात एक मुद्दा प्रामुख्याने समोर आलाय. तो म्हणजे तालिबानच्या आक्रमणानंतर आता अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं काय होणार??
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे राशिद खान. छोट्या चणीच्या या बॉलरने संपूर्ण जगभरात आपलं नाव कमावलं आहे. आयपीएल, बिग बॅश लिग, कॅरेबिअन प्रिमीअर लिग, हंड्रेड यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये राशिद खान खेळतो. सध्या हंड्रेट या लिगमध्ये खेळत असलेल्या राशिद खानने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटरवरुन जागतिक पातळीवरच्या नेत्यांना अफगाणिस्तानमधला हा रक्तपात थांबवण्याची विनंती केली होती.
एरवी युद्धाच्या छायेत असलेल्या अफगाणिस्तानात गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट चांगलंच वाढलं. काही महत्वाच्या भागांमध्ये तयार करण्यात आलेली क्रिकेट मैदानं आणि सराव शिबीरं यांच्यामुळे अफगाणी युवकांना क्रिकेटच्या रुपाने आपलं टॅलेंट दाखवण्याची एक संधी मिळाली. परंतू सध्याच्या घडीला…अफगाणिस्तानतली सर्व क्रिकेट स्टेडीअम ही तालिबानच्या हातात आलेली आहेत.
अफगाणिस्तानातही क्रिकेट मैदानं आता तालिबान्यांच्या हातात –
-
कंदाहर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीअम
-
कुंदुझ क्रिकेट स्टेडीअम
-
खोश्त सिटी स्टेडीअम
-
बल्ख क्रिकेट स्टेडीअम
-
काबुल नॅशनल क्रिकेट स्टेडीअम
-
गाझी अमानुल्ला क्रिकेट स्टेडीअम
अफगाणिस्तानातली ही सर्व क्रिकेट स्टेडीअम आता तालिबान्यांच्या हातात आहे. अफगाणिस्तानी सैन्याने यातील काही मैदानं वाचण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यावेळी तालिबानी अतिरेकी राजधानी काबुलमध्ये शिरले…राष्ट्रपती घनी यांनी देश सोडून पलायन करायचं ठरवलं…त्यावेळी अफगाणिस्तानाच एका प्रकारे तालिबान शासन लागू झालं आणि संपूर्ण क्रिकेट मैदानं तालिबानच्या हातात आली.
Rashid Khan चा परिवार अडकला अफगाणिस्तानात, Taliban चा राजधानी काबुलवर ताबा
या सत्तांतरानंतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं भवितव्य आता धोक्यात आहे. खासकरुन तेव्हा ज्यावेळी टी-२० वर्ल्डकप हा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तालिबानच्या हातात सत्ता आल्यामुळे…त्यांचा इतिहास पाहता खेळाडूंना मैदानात सरावासाठी सोयी-सुविधा आणि मोकळं वातावरण मिळेल याची शाश्वती नाहीये. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ तयारी कशी करणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
सध्याच्या घडीला राशिद खानसह, मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान यासारखे अफगाणी खेळाडू हे हंड्रेड या स्पर्धेच्या निमीत्ताने लंडनमध्ये आहेत. उर्वरित खेळाडू हे अफगाणिस्तानातच आहेत. अफगाणिस्तानचा आगामी ऑस्ट्रेलिया दौराही याच कारणामुळे पुढे ढकलण्यात आलाय. याचसोबत आयपीएल आणि अन्य महत्वाच्या स्पर्धांमध्ये अफगाणी खेळाडू संघ सहभागी होऊ शकतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.
क्रिकेटबद्दल काय आहे तालिबान्यांचा दृष्टीकोन?
तालिबान्यांनी याआधी क्रिकेटवर बंदी घातली होती. परंतू २००० सालात तालिबानने क्रिकेटला मनोरंजनात्मक खेळाचा दर्जा देत त्यावरची बंदी उठवली. ज्यानंतर अफगाणिस्तानात क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. इतकच नव्हे तर सध्याच्या तरुण पिढीतल्या तालिबानी नेत्यांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता आहे.
ज्यावेळी अफगाणिस्तानचा संघ एखादा आंतरराष्ट्रीय सामना जिंकतो त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांमध्ये बंदुकीतून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा केला जातो. इतकच नव्हे तर काही तालिबानी अतिरेकी हे अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची मॅच असेल तेव्हा रेडीओवर ती मॅच ऐकणं, सोशल मीडियावरुन त्याचे अपडेट घेत असतात. त्यामुळे सध्याच्या घडीला तालिबानी अतिरेकी क्रिकेट संघाला किंवा खेळाडूंना कोणताही धोका पोहचवतील अशी परिस्थिती वरकरणी दिसत नाही.
सध्याच्या अफगाणिस्तानी संघातले अनेक खेळाडू हे गृहयुद्धा दरम्यान पाकिस्तानच्या शरणार्थी शिबीरांमध्ये होते. इकडेच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. काबुल आणि इतर भागांवर कब्जा मिळवण्याच्या आधी ज्या भागांवर तालिबानची सत्ता होती तिकडे क्रिकेट जास्त प्रमाणात ऐकलं जायचं. इतकच नव्हे तर तालिबानी शिबीरांमध्ये राहिलेल्या असगर अफगाण सारख्या खेळाडूने स्वतःत सुधारणा करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं होतं. परंतू तालिबानचा रक्तरंजित इतिहास पाहता….ते खेळाडूंना आधीच्या सरकारप्रमाणे खुल्या संधी देतील का? क्रिकेटची मैदानं आणि तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर टिकवतील का हा खरा प्रश्न आहे. याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अफगाणिस्तानच्या संघावरच सावट कायम असणार आहे.
ADVERTISEMENT