भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्याची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ रद्द करण्यात आला. सकाळपासून साऊदम्प्टनमध्ये पाऊस सुरु होता ज्यामुळे सामना सुरु होण्यासाठी उशीर झाला.
ADVERTISEMENT
पहिल्या सत्राचा खेळ वाया गेल्यानंतर पावसाने काही क्षणांसाठी उसंत घेतली होती. यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी आणि मैदानावर आलेलं पाणी साफ करायला सुरुवात केली. अंपायर्सनी खेळपट्टीचं निरीक्षण केल्यानंतर हवामाना अंदाज घेऊन पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करत असल्याची घोषणा केली.
साऊदम्प्टनमध्ये पुढील ५ दिवसांपैकी ३ दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये किती दिवस सामना खेळवला जाईल याबद्दल अजुनही साशंकताच आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसारख्या महत्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामन्यात पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण पसरलं आहे.
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), ऋषभ पंत (विकेट किपर), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
ADVERTISEMENT