Sambhaji Bhide: गांधी, फुले ते साईबाबा, भिडेंनी कुणालाच सोडलेलं नाही, तरीही…
संभाजी भिडेंच्या विरोधात रान पेटलं असताना त्यांच्या समर्थनार्थ देखील आंदोलनं होताना दिसत आहेत. जाणून घ्या संभाजी भिडेंविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Sambhaji Bhide Controversy : निलेश झालटे, मुंबई: संभाजी भिडे हे नाव कुणाला माहिती नसेल तर नवलच. कुणी त्यांना संभाजी भिडे म्हणतं, कुणी भिडे गुरुजी, कुणी मनोहर भिडे तर कुणी मनोहर कुलकर्णी असंही. 85 वर्षांहून जास्त वयाचे असलेले भिडे सांगलीत राहून राज्यभरात वातावरण निर्मिती करण्यात आघाडीवर असतात. ही वातावरण निर्मिती पॉझिटीव्ह होते की निगेटिव्ह हे आपल्याला सध्या उमटत असलेल्या प्रतिक्रियांवरुन लक्षात येत असेल. एकीकडे संभाजी भिडेंच्या विरोधात रान पेटलं असताना त्यांच्या समर्थनार्थ देखील आंदोलनं होताना दिसत आहेत. अगदी ठळकपणे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडेंना अटक करण्याची मागणी आता होतेय. (sambhaji bhide criticized mahatama gandhi mahatama phule saibaba but he gave still support)
ADVERTISEMENT
भिडे आता चर्चेत आहेत ते महात्मा गांधी,महात्मा फुले आणि साईबाबांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं. भाजपसह सर्वच पक्षांचे नेते भिडेंचा निषेध करत आहेत. तसं तर वादग्रस्त वक्तव्य आणि भिडे यांचं कनेक्शन जुनं आहे. हेच कनेक्शन आपण जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या संभाजी भिडेंविषयी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या भिडेंच्या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर ३२ मण वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केलाय. त्यांचं मूळ नाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी. १९८० च्या दशकात संभाजी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र पुढे त्यांनी संघापासून फारकत घेतली. ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संभाजी भिडे सांगत असतात. त्यांना त्यांचे धारकरी भिडे गुरुजी असं संबोधतात.
हे वाचलं का?
आता आपण संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत जाणून घेऊयात… ही वादग्रस्त वक्तव्य सांगताना आम्हाला काही ठिकाणी नैतिकता पाळत आवाज बीप करावा लागणार आहे, हे आधीच स्पष्ट करतो. भिडेंच्या ताज्या वादग्रस्त वक्तव्यांनी याची सुरुवात करुयात…
महात्मा गांधी यांच्या संदर्भात बोलताना भिडेंनी म्हटलं की, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.
ADVERTISEMENT
तर साईबाबांविषयी बोलताना भिडेंनी म्हटलंय, आपला हिंदू समाज साईबाबाला पुजतो, त्या साईबाबांची लायकी काय ते तपासा, सर्वप्रथम त्या साईबाबाला आपल्या घर-घरातील देव्हा-यातून बाहेर काढून फेका लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मी काही डोके सटकलेला माणूस नाही, मी सर्व जबाबदारीने बोलतोय हे लक्षात घेऊन त्याला हिंदूंचा देव मानू नका. साईबाबा मंदिर समितीकडून यासंदर्भात भिडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
महात्मा फुलेंबद्दल बोलतानाही भिडेंची जीभ घरसलीय. देशात इंग्रजांनी ज्या ”—- समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भ%@^ यादीतले आहेत. इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकण्यासाठी देशात सुधारक नावाची जात पैदा केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात उत्तर प्रदेशामध्ये भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूमध्ये रामास्वामी नायकर व महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा प्रामुख्याने समावेश होता. या सगळ्यांच्या ढुं%@ देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहे. यावर मी दोन तास भाषण देऊन मोठे खुलासे करू शकतो.
भिडे आधी पंडित नेहरुंवरही बोलले होते. नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते. देशासाठी नेहरूंचे नखभरही योगदान नसताना ते पंतप्रधान झाले, याचे शल्य त्यांनी व्यक्त केले. नेहरूंनी चीनसोबत केलेला ‘पंचशील’ करार हिंदुस्थानाला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला,
भिडेंनी देशाबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “जगाच्या पाठीवरती १८७ राष्ट्रं आहेत. त्या राष्ट्रांमध्ये पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घकाळ परकीयांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.”
कोरोना काळात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं जे खूपच व्हायरल झालेलं. ‘सरकारकडून करोना वाढवला जातो आहे. देशात चाललेलं हे षडयंत्र आहे. वारीमुळे करोना वाढतो असं सांगणारं हे सरकार आहे. हे सगळं थोतांड आहे, मंदिराचं कुलुप तोडा आणि रस्त्यावर उतरा असं आवाहन संभाजी भिडेंनी करोना काळात केलं होतं. एवढंच नाही तर गां#$$ प्रवृत्तीच्या लोकांनाच करोना होतो. करोनामुळे तीच माणसं मरतात जी जगायला लायक नाहीत.
भिडेंनी आंबा आणि अपत्यप्राप्तीबाबत एक भयंकर वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं. भगवंताची कृपा आहे मला एक कोय मिळाली. त्या कोयीचं रोपटं करुन त्याचं झाड आलं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची मजा काय आहे तुम्हाला सांगतो. लग्न होऊन ८, १०, १२ वर्षे झालेल्यांननाही पोर होत नाही. अशा स्त्री-पुरुषांनी, पती-पत्नींनी या झाडाची फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. या झाडाच्या बाबतीत मी माझ्या आईशिवाय इतर कुणाला सांगितलं नव्हतं, आता तु्म्हाला सांगतो आहे. आत्तापर्यंत १८० जोडप्यांना या झाडाचे आंबे खायला दिले आहेत. त्यांना पथ्य काय पाळायचं ते पण सांगितलं. १५० पेक्षा जास्त जोडप्यांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल.अपत्य नसेल तर होते असा हा आंबा आहे. नपुंसकत्वार तोडगा आणि वंध्यत्वावर ताकद देणारा तो आंबा आहे.
शेवटाकडे जाताना भिडेंनी मंत्रालयात एका महिला पत्रकाराला टिकली लावण्यावरुन झालेला वादही बघा. संभाजी भिडे 2 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी साम या मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी भिडे यांना गाठून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या महिला पत्रकाराला मुलाखत देण्यास संभाजी भिडेंनी नकार दिला. ‘आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो.’ असं भिडे म्हणाले. यानंतर हे प्रकरण खूप चर्चिले गेले. भिडेंवर यावेळीही सर्वस्तरांतून टीका केली गेली.
संभाजी भिडे हे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत असतात. यावरुन ते नेहमीच वादात सापडतात. आता त्यांच्याविरोधात जवळपास सर्वच पक्षीयांनी आपली भूमिका मांडलीय. तरी देखील त्यांच्या समर्थकांनी मात्र त्यांची बाजू लावून धरलीय. इतकंच काय तर त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक सुद्धा केलाय. भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांना आणि सततच्या भूमिकांच्या मागे नेमकं कोण आहे? त्यांना अटक होणार का? आणि यापुढे बोलताना तरी भिडेंच्या बोलण्यावर लगाम येणार का? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT